आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपुरात कोळशापासून युरिया निर्मितीचा प्रकल्प, ६ हजार कोटींची गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त दरात युरिया उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळशापासून युरिया निर्मितीच्या प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चित झाली असून वेकोली कोळशाचा पुरवठा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

अमेरिकेची कंपनी हा प्रकल्प उभा करणार असून या प्रकल्पात तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पासाठी भद्रावती परिसरातून वेकोली कोल लिंकेज देणार असून दराबाबत लवकरच वाटाघाटी होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मागील वर्षभरापासून या प्रकल्पाचा पाठपुरावा चालविला आहे. त्याला यश आल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, दरवर्षी सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची सबसिडी युरियावर द्यावी लागते. हा प्रकल्प सुरू झाल्यावर अतिशय स्वस्त दरात देशातच कोळशापासून युरियाचे उत्पादन घेता येणार आहे. प्रकल्प महाराष्ट्रात असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के कमी दरात युरिया उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार संबंधित कंपनीशी सामंजस्य करार करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याकडे इनोव्हेटिव्ह प्रकल्पांबाबत विशेष जबाबदारी सोपवल्याचे गडकरी म्हणाले.

मोर्शीलाही संत्रा प्रकल्प
कारंजा येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून या केंद्रातून आखाती देशांमध्ये संत्रा निर्यातीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, कारंजाप्रमाणेच आता मोर्शी येथेही संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे गडकरी यांनी या वेळी बोलताना सांगितले.

केसांपासून अॅमिनो अॅसिड
केसांपासून अॅमिनो अॅसिड तयार करण्याचा प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे सुरू झाला असून आम्हाला १८० कोटी रुपयांच्या अॅमिनो अॅसिडची ऑर्डर मिळाली असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, या प्रकल्पासाठी तिरुपती येथील देवस्थानासह सर्वच ठिकाणांहून केसांची खरेदी केली जात आहे. आता त्याचा तुटवडा असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...