आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवादी अणेंविरोधात काँग्रेस-शिवसेना एकत्र, पदावरून हटवण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गुरुवारी विधिमंडळात गदारोळ झाला. महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या अणे यांना निलंबित करावे तसेच सरकारने स्वतंत्र विदर्भासंबंधीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र, ती अमान्य झाल्याने काँग्रेस सदस्यांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. या गोंधळातच दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.

"स्वतंत्र विदर्भ होण्यासाठी केंद्र सरकारने सार्वमत घ्यावे,’ असे वक्तव्य अणे यांनी केले होते. शिवसेना, काँग्रेस आणि शेकापने अणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव आणत अणे यांना पदमुक्त करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि शेकापच्या जयंत पाटील यांनीही हीच भूमिका घेतली. मात्र, उपसभापती वसंत डावखरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
‘महाधिवक्ता पदावर असताना अणे यांनी राज्य तोडण्याची भाषा करणे चुकीचे आहे. महाधिवक्त्याने वैयक्तिक मते या पद्धतीने जाहीरपणे व्यक्त केल्याचे उदाहरण यापूर्वीच्या इतिहासात नाही’, असे दत्त म्हणाले. अणे यांनी वेगळ्या विदर्भाबद्दलची भूमिका अजूनही मागे न घेतल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. "महाधिवक्ता स्वतःहून काही बोलू शकत नाही. राज्य सरकारनेच त्यांना संबंधित वक्तव्य करण्यास सांगितले होते का,’ असा प्रश्न शरद रणपिसे यांनी उपस्थित केला.
भाजपकडून फसवणूक
निवडणूक प्रचारात भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता अणे यांच्या वक्तव्यावर माैन बाळगत भाजप विदर्भाची फसवणूक करत असल्याचा आरोप विधान परिषदेत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी केला. तर, वेगळ्या विदर्भाला काँग्रेसला विरोध आहे का, हे आधी स्पष्ट करा, असा प्रतिप्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.