आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामांपासून वंचित अंतरगावकऱ्यांचा बहिष्कार, प्रशासनाच्या विनवणीनंतरही ग्रामस्थ निर्णयावर ठाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर अंतरगाव (शिवाजी) येथील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला हाेता. प्रशासनाने लाख समजूत काढल्यानंतरही मंगळवारी हे गावकरी अापल्या निर्धारावर ठाम राहिले, त्यामुळे   दिवसभर गावातील मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.
 
अंतरगावपाठोपाठ खल्लार सर्कलमधील मिर्झापूरच्या गावकऱ्यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला, या गावात मात्र १३ टक्के मतदान झाल्याची माहिती  नायब तहसीलदार अनंत पोटदुखे यांनी दिली. दरम्यान, बळजबरीने मतदान करवून घेतल्याचा आरोप  अंतरगाव येथील तीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.
     
अमरावती व अकोला जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या अंतरगाव शिवाजी येथे कोेणताही विकास न झाल्याने गावकऱ्यांनी  निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला हाेता.
 
दुसरीकडे, बहिष्काराचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी  शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन गावकऱ्यांचे मन:परिवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी बहिष्कार कायम ठेवल्याने मंगळवारी दिवसभर गावातील मतदान केंद्रावर शुकशुकाट कायम होता. अंतरगावची लोकसंख्या एक हजाराच्या वर असून ५६४ मतदार आहेत. सकाळपासून एकही मतदार मतदान केंद्रावर पोहोचला नाही. 
  
दरम्यान, झोनल अधिकारी अरविंद गुढधे व नायब तहसीलदार एम. डी. चव्हाण यांनी गावचे पोलिस पाटील जयंत कथलकर व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नोकरीवरून कमी  करण्याचा धाक दाखवून व ओळखपत्रसुद्धा आणण्याची सवड न देता बिनाओळखपत्राने त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
 
सहायक निवडणूक निरीक्षक सुनील पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली असता मतदान केंद्रावर कुणीही मतदार उपस्थित नसल्याचे पाहून  त्यांनी कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांकडे चर्चेसाठी पाठवले हाेते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश अाले नाही.   

भापकी येथेही बहिष्कारास्त्र  
प्रलंबित पुनर्वसन, सोयी-सुविधांचा अभाव, निवेदन मागण्या करूनही प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील भापकी येथील गावकऱ्यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पाचशे लाेकवस्ती असलेल्या या गावात १९९१ मध्ये आलेल्या पुरात बहुतांश भाग वाहून गेला.
 
मात्र गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सोमवारी बैठक घेऊन बहिष्काराचा निर्णय घेतला. दरम्यान, काही लाेकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही गावकरी बहिष्कारावर ठाम होते. या गावात साडेतीनशे मतदार असून तीन वाॅर्ड आहेत.
 
बळजबरीने मतदान करण्यास भाग पाडले    
- पोलिस पाटील या नात्याने मी निवडणूक केंद्रावर गेलो असता निवडणूक  केंद्राला भेट देण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांनी मला बळजबरी करून ओळखपत्रसुद्धा आणू न देता मतदान करण्यास भाग पाडले.  जयंत कथलकर, पोलिस पाटील, अंतरगाव (शिवाजी)  
 
दमदाटी करून मतदान    
- निवडणूक केंद्रावरील व्यक्तीने आम्हाला बोलावून नेले व तेथे उपस्थित असलेल्या बीडीओ साहेबांनी आम्हाला नोकरी करायची की नाही, अशी दमदाटी करून मतदान करण्यास भाग पाडले.  माझ्या अंगणवाडी मदतनीसालासुद्धा बोलावून तिचेही मतदान करवून घेतले. सविता कथलकर, अंगणवाडी सेविका 
बातम्या आणखी आहेत...