आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीच्या वाढदिवशी निघणार आईची अंत्ययात्रा, कुलरचा शॉक लागून मातेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील दहीसाथ परिसरात राहणाऱ्या खामगाव अर्बन बँकेत नोकरीवर असलेल्या आरती सागर गौड (वय २८)यांचा शनिवारी (दि. ८) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कुलरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आरती गौड यांची मुलगी देवांशीचा रविवारी (दि. ९) पहिला वाढदिवस साजरा होणार होता. मात्र,नियतीने साधलेल्या या दुर्दैवी डावामुळे मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या पाहुण्यांना आता आईच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागणार असल्याने परिसरातील वातावरण शोकमग्न झाले होते. 
 
एमबीएनंतर आरती गौड या शहरातच खामगाव अर्बन बँकेत नोकरी करत होत्या तर त्यांचे पती सागर हे गडचिरोलीला पोलिस दलात कार्यरत आहे. रविवारी (दि. ९) आरती यांची मुलगी देवांशी हिचा पहिला वाढदिवस आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार होता. त्यासाठी बडनेरा मार्गावरील एक लॉनसुध्दा आरक्षित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गौड यांच्या घरी काही पाहुणेही पोहचले होते.
 
 दरम्यान शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आरती या घरातच असलेल्या कुलरच्या शेजारी असलेला झाडू घेण्यासाठी गेल्या असता त्यांना कुलरमधील संचारलेल्या वीजेचा जबर झटका बसला. त्यांनी एकदम आरडाओरड केली, त्यावेळी घरातील मंडळींनी त्यांच्याजवळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्या बेशुध्द झाल्या होत्या. त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरती यांच्या अकस्मात मृत्यूने गौड परिवारासह संपुर्ण परिसरात शोककळा पसरली. मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या पाहुण्यांना आता आईच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागणार आहे. 
 
चिमुकलीचे मातृछत्र कायमचे हरवले 
मृतक आरती यांची देवांशी नामक चिमुकली रविवारी एक वर्षाची होणार आहे. मात्र तत्पुर्वीच देवांशीच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...