आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ : शाळेतून दाखला न काढण्याची विद्यार्थ्यांना धमकी, उद्दामपणा सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - अल्पवयीन विद्यार्थिनींवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचाराचे घडलेले प्रकरण व त्यानंतर पालकांचा उद्रेक यामुळे वादग्रस्त ठरलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलवर नियंत्रक म्हणून शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भयभीत विद्यार्थिनी व पालकांना दिलासा देणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार अाहे. ‘या शाळेतून कुणीही दाखला काढू नये. असे केल्यास त्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार नाही,’ असे पाटेकर धमकावत असल्याच्या तक्रारी अाहेत. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही पालकांनी बुधवारी थेट शिक्षणाधिकारी पाटेकर यांच्या घरी धडक देत त्यांना जाब विचारला.
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संस्थेचे सचिव किशाेर दर्डा यांच्यासह दाेन अाराेपी शिक्षकांना अटक करण्यात अाली अाहे. दरम्यान, या घटनेमुळे मागील अाठवडाभर शाळेचा कारभार बंदच हाेता. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे काेणतेही नुकसान हाेऊ नये या उद्देशाने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात प्रशासक (नियंत्रक) म्हणून शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून पूर्वीप्रमाणे शाळा सुरू झाली. मात्र लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे धास्तावलेल्या अनेक पालकांनी अाता अापल्या पाल्यांना या शाळेत ठेवायचेच नाही असा निर्णय घेतलेला अाहे. त्यामुळे शाळा सुरू झाली तरी विद्यार्थी संख्या अत्यल्पच अाहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी अापल्याला शाळा बदलायची अाहे असे सांगितल्यानंतर पाटेकर यांनी त्यांना दमच भरला. ‘या शाळेतील कुणीही दाखला काढायचा नाही. जे काढतील त्यांना दुसऱ्या शाळेतही प्रवेश मिळणार नाही,’ अशी धमकीवजा सूचना त्यांनी केली.

पाटेकरांनी दिलेली धमकी विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सांगितली. त्यावर पालकांच्या संतापाचा पुन्हा स्फाेट झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एकत्र येत संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या घरावर धडक दिली. ‘अामच्या पाल्यांचे प्रवेश तुम्ही राेखणार काय?’ असा जाब त्यांना विचारण्यात अाला. पालकांचा संताप पाहून पाटेकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्याकडून सांगण्यात आलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात येत अाहे. मी चुकीचे काही बोलले असेन तर त्यासाठी माफी मागते,’ अशी विनवणीही त्यांनी केली. तसेच कुणालाही टीसी देण्याचे किंवा त्यांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेले पैसे परत करण्याचे अधिकार माझ्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र संतप्त पालक काही एेकण्याच्या तयारीत नव्हते. ‘तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला या शाळेत पाठवले असते का?’ असा सवालही पालकांनी त्यांना विचारला.

पालक दाखला काढण्याच्या तयारीत
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा पालकांनी आपल्या पाल्यांची नावे शाळेमधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे दाखले घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सध्या शाळेत कुणीच अधिकृत अधिकारी नसल्याने त्यांना दाखला मिळत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी अाहेत.

टीसी नसेल तरीही मिळताे प्रवेश
मी अशा प्रकारची धमकी दिली ही बाब खोटी आहे. विद्यार्थ्यांकडे दाखला नसला तरी त्यांना दुसऱ्या शाळेत जाता येते. आरटीईनुसार टीसी नसेल तरी कुठल्याही शाळेत आठवीपर्यंत प्रवेश घेता येतो. यासंदर्भात मी काहीच बोलले नाही तरी माझ्यावर चुकीचा आरोप केला जात आहे.
सुचिता पाटेकर, नियंत्रण अधिकारी तथा शिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...