आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्पुरत्या यादीमुळे येणार ११ उमेदवारांवर "गंडांतर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- राज्याच्या विधी न्याय विभागाने सुचवल्यानुसार जिल्हा निवड समितीने कंत्राटी ग्रामसेवकांची पूर्वीची यादी रद्द केली. दरम्यान, प्रशासनाने नव्याने तात्पुरती निवड यादी प्रकाशित केली. प्रत्यक्षात मात्र, पूर्वीची यादी रद्द झाल्यामुळे तब्बल ११ उमेदवारांवर गंडांतर येण्याची शक्यता दिसून येत आहे. विधी न्याय विभागाकडे ही यादी पाठवण्यात येणार असून, आक्षेप नोंदवण्यासाठी सात दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गत वर्षी १०८ कंत्राटी ग्रामसेवकांची पदभरती घेतली होती. यातून ८३ उमेदवार अंतिम निवड यादीत आले होते. दरम्यान, एका महिला प्रवर्गातील उमेदवाराच्या मुद्द्यांवरून मोठे रणकंदन निर्माण झाले. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून उमेदवार निवडीची यादीबाबत फेरविचार करावा, असे निर्देश विधी न्याय विभागाने दिले. मे महिन्याच्या शेवटी उपसचिव गिरीश भालेराव यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषदेत धडकल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. यानुसार ३१ मे रोजी जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासनाच्या तीन ते चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण बाबींवर चर्चा पार पडली. चर्चेअंती कंत्राटी ग्रामसेवकांची यादी सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, यानंतर प्रक्रियेत अडचणी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची शंका प्रशासनाला आली होती. तरीसुद्धा प्रशासकीय यंत्रणेने सुधारित यादी तयार केली. ही यादी गुरुवार, जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, सध्या जिल्हा परिषदेच्या बोर्डावर तात्पुरती निवड यादी लावण्यात आली आहे. नव्याने यादीनुसार तब्बल १० महिला आणि एक पुरुष उमेदवार निवडीस पात्र ठरला असून, पूर्वीच्या यादीतील अकरा उमेदवारांना नोकरीवर पाणी फेरण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने अंगावर आलेली खोड लक्षात घेता शासनाकडे मार्गदर्शन मागवून स्वत:ची जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचायत विभागाचा चुकीचा फटका त्या अकरा उमेदवारांना चांगलाच बसलाआहे.विशेष म्हणजे नव्या यादीवर आता सात दिवसांचा आक्षेप नोंदवण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. या कालावधीत उमेदवार निवड यादीवर आक्षेप घेऊ शकतात. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शनानंतरच पुढील पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती पंचायत विभागाकडून देण्यात आली आहे. एकंदरीत यामुळे काही उमेदवारांवर नियुक्तीपूर्वीच गंडांतर आले आहे. अगोदरच या प्रकरणात नियुक्तीमध्ये विलंब झाला आता कारवाई केली जात आहे.

त्या उमेदवाराच्या नावावर कात्री
पंचायत विभागाने अगोदरच विलंबाने यादी लावून निवड झालेल्यांवर अन्याय केल्याचा आरोप उमेदवारांकडून केल्या जात आहे. विशेष म्हणजे त्वरित नियुक्ती ऑर्डर द्यावी, म्हणून जिल्हा परिषदेसमोर पात्र उमेदवारांनी उपोषण सुरू केले होते. ज्या उमेदवाराच्या माध्यमातून उपोषण सुरू झाले होते. त्याच उमेदवाराच्या नावावर आता नव्याने तयार केलेल्या यादीतून कात्री लावण्यात आली आहे.

...मग कारवाई होणे अपेक्षित
पंचायत विभागाने कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती देण्यास विलंब केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याच कारणाम्यामुळे पूर्वी पात्र ठरलेल्या त्या उमेदवारांना फटका बसला. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे विलंब करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरू आहे. यात जिल्हा निवड समितीने जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या त्या अधिकाऱ्याला क्लीन चिट दिली हे विशेष.

संकेतस्थळावर यादी टाकण्याचे काम उशिरापर्यंत
जिल्हानिवड समितीच्या माध्यमातून पार पडलेल्या प्रत्येक परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संकेतस्थळावर आज, गुरुवार जून रोजी यादी अपलोड करणे सुरू होते. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण झालेच नव्हते. त्यामुळे बाहेर गावातील उमेदवारांना याबाबत माहिती मिळण्यास नक्कीच विलंबच झाला.
बातम्या आणखी आहेत...