आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजापेठ हेच नाव राहील, परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते माॅडेल बसस्थानकाचे लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता शहरातील दुसऱ्या माॅडेल बसस्थानकाचे नाव राजापेठ हेच कायम राहणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. युवा स्वाभिमान पक्षाचे नेते बडनेराचे आमदार रवी राणा यांनी या बसस्थानकाला राजे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्याची मागणी केली होती.
अमरावती विभागातील मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज ९४४ बसचे आवागमन होते. त्यामुळे तेथे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. ती रोखण्यासाठी राजापेठ बसस्थानकावरून ३२६ बसेसचे दररोज आवागमन होणार आहे. तसेच प्रवाशांची विशेष सोय केली जाईल, असे प्रास्ताविकात प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पटारे यांनी सांगितले.

२००४ मध्ये माझ्याच हस्ते या स्थानकाचे भूमिपूजन झाले होते. १२ वर्षांनी उद्घाटन समारंभात सहभागी झाल्याचा आनंद होत आहे. सर्वच बसेसला शहरातून मध्यवर्ती स्थानकावर जावे लागायचे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायची. आता ही समस्या सुटणार आहे, असे अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख म्हणाले.

मेळघाटातील बसेसची स्थिती दयनीय आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. तेव्हा तेथे नवीन बसेस द्या, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली. येत्या तीन-चार वर्षांत राज्यातील सर्व बसेस एसी असाव्यात यासाठी परिवहन विभाग प्रयत्न करेल, अशी आशा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ३० आसनी बस चालवली तर लहान मार्गांवरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोय होईल, अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्र एसटी कामगार सेना, अमरावती विभाग, महाराष्ट्र मोटार कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघ तसेच अन्य कर्मचारी संघटनांतर्फे परिवहन मंत्र्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी फीत कापून नव्या इमारतीचे तसेच नारळ फोडून हिरवी झेंडी दाखवून रावते यांनी राजापेठ स्थानकावरून नवीन बस सेवेला सुरुवात केली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पाेटे, बडनेराचे आमदार रवी राणा, अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी िकरण गित्ते, माजी आमदार संजय बंड, नगरसेवक प्रशांत वानखडे, प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पटारे, विभाग िनयंत्रक राजेश अरोकार, कार्यकारी अभियंता नरेंद्र खांडेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, वास्तुशास्त्रज्ञ आशुतोष शेवाळकर, आगार व्यवस्थापक मनोहर धजेकर, माणिक राऊत तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचालन ज्योती तोटेवार यांनी केले.

मोठ्याशहरांसाठी राजापेठहून नियमित बसफेऱ्या : स्थानकाचेउद्घाटन झाले की, राजापेठ बसस्थानकावरून नियमित बसफेऱ्या नागपूर, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, पुणे, खामगाव, शेगाव, नाशिक आणि जळगावसाठी सुरू होतील. त्यामुळे या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना राजापेठ बसस्थानकावर यावे लागेल. या ठिकाणी जलद तसेच निमआराम गाड्यांचीही सोय राहणार आहे. या गाड्या मध्यवर्ती स्थानकावरून सुटणार नाहीत. नागपूरच्या प्रवाशांसाठी विशेष सोय करण्यात आली असून, नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या बघता जरी बसेस राजापेठ स्थानकावरून सुटणार असल्या तरी त्या नियमितपणे मध्यवर्ती स्थानकावरून जातील येतील. केवळ त्या स्थानकाच्या आत जाणार नाहीत, बाहेरूनच निघतील.

मलावाटले राणा कमळ लावून आले : आमदाररवी राणा यांनी राजापेठ बसस्थानकाच्या उद्घाटनासाठी असा काही पाठपुरावा केला की, आज ते कमळ लावून आले असावेत, असा भास झाल्याची कोपरखळीही रावते यांनी हाणली.

राणा यांनी बसस्थानकाचे उद्घाटन करण्यासोबतच त्याला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे निवेदनातून केली होती. रावते यांचे बसस्थानकावर आगमन झाल्यानंतर आ. राणा यांनी त्यांना संपूर्ण इमारत दाखवून तेथे असलेल्या त्रुटींची माहिती दिली. त्यामुळे शेवाळकर यांनी अपेक्षेप्रमाणे काम केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.

चालक-वाहकांच्या हस्ते झाले उद्घाटन
परिवहन मंत्री रावते यांनी पहिल्या बसचे चालक जी. आर. करपाते, वाहक एम. एन. थोरात, दुसऱ्या बसचे चालक एस. टी. धोटे, वाहन नीलेश धावडे यांना कोनशिलेजवळ बोलावून त्यांच्याच हस्ते उद्घाटन केले. तसेच त्यांचे नावही कोनशिलेवर लावले जाईल, असे जाहीर केले.
शासकीय यंत्रणेच्या कूर्मगतीवर टीका करताना राजापेठ बसस्थानकाला पूर्ण होण्यास विनाकारणच १२ वर्षे लागल्याचा टोमणाही रावते यांनी हाणला. २००४ मध्ये बसस्थानकाच्या जागेचे भूमिपूजन झाले. त्यानंतर चार वर्षे नकाशा तयार होण्यासाठी लागलेत. २००८ मध्ये तो महानगरपालिकेत मंजुरीसाठी गेला. त्याला मंजुरी देण्यास पाच वर्षे लागली. त्यानंतर २०१३ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आणि २०१६ मध्ये उद्घाटन झाले, हे आपली यंत्रणा कशी काम करते याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या पद्धतीने बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते ते झाले नाही. त्यामुळे शेवाळकर यांनी उर्वरित काम लवकर पूर्ण करून द्यावे, असेही परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.

अखेर १२ वर्षांचा वनवास संपला; उर्वरित कामे वेगाने करण्याचे निर्देश
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दोन बसगाड्यांना हिरवी झेंडी दाखवून राजापेठ माॅडेल बसस्थानकाचे लोकार्पण केले. यावेळी स्थानिक अामदार उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...