आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र चोरट्याला शहरात प्रथमच शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात तीन ते चार वर्षांपूर्वी मंगळसूत्र चोरट्यांनी हैदोस घातला होता. दरदिवशी सरासरी एका महिलेचे मंगळसूत्र चोरी करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावला होता. सर्वाधिक मंगळसूत्र हिसकणाऱ्यांमध्ये अकोला येथील एका अट्टल चोरट्याचा समावेश होता. या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून अनेक मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघड केले होते. दरम्यान त्यापैकी एका गुन्ह्यात अकोल्याच्या या अट्टल मंगळसूत्र चोरट्यास येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा गुरूवारी (दि. २२) सुनावली आहे. मंगळसूत्र हिसकण्याप्रकरणात शिक्षा झालेले शहरातील हे पहिलेच प्रकरण आहे. 
 
गुलाम हुसेन (२०, रा. अकोला) असे शिक्षा झालेल्या मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. गाडगेनगरनगर ठाण्याच्या हद्दीतील मालटेकडी ते गर्ल्स हायस्कूल मार्गादरम्यान असलेल्या तत्कालीन आशीर्वाद मंगल कार्यालयासमोर २९ डिसेंबर २०१३ ला सांयकाळी एका दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यापैकी एकाने दुचाकीवर जाणाऱ्या रश्मी उदय गावंडे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर झडप मारुन पळवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शंकर माणिकराव काळे हे त्याच मार्गाने जात होते. त्यांनी आरडाअोरड केल्यामुळे मंगळसूत्र हिसकरणारे भामटे घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान या प्रकरणी शंकरराव काळे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मंगळसूत्र चोरट्यांविरुध्द वाटमारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या कालावधीमध्ये शहरातील राजापेठ, फ्रेजरपुरा आणि गाडगेनगर या तीन ठाण्यांच्या हद्दीत दरदिवशी मंगळसूत्र चोरी सुरू होती. वाढलेल्या मंगळसूत्र चोरींमुळे महिलांना तर घराच्या बाहेर निघणे कठिण झाले होते. दरम्यान अकाेल्यात राहणारा गुलाम हुसेन हा मंगळसूत्र चोरटा सातत्याने दुचाकीने अकोल्यातून शहरात येतो, शहरात चोऱ्या करून दुचाकीनेच नागपूरला जातो, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे तत्कालीन गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला अकोल्यातून अटक केली होती. त्याने आशीर्वाद मंगल कार्यालया समोरील घटनेची कुबूली देतानाच शहरातील इतरही गुन्हे केल्याचे कबूल केले होते. सदर प्रकरणाचा तपास गाडगेनगरचे तत्कालीन पीएसआय संजय पवार यांनी पुर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान या प्रकरणाची न्यायालयात सुनावनी सुरू झाली. गुलाम हुसेनविरुध्द गुन्हा सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्ष कारावास तसेच एक हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. दंड भरल्यास दोन महिने अतिरीक्त साधी कैद भोगावी लागणार आहे, या प्रकरणात शासकिय पक्षाकडून अॅड. एस. एम. खरड यांनी युक्तीवाद केला आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणून एएसअाय प्रमोद तेलमोरे यांनी काम पाहीले आहे. अशी माहीती पोलिस आयुक्तालयाच्या कोर्ट मॉनिटरींग सेलने दिली आहे. विशेष म्हणजे मंगळसूत्र चोरट्याला शिक्षा होण्याची ही शहरातीलच पहिलीच वेळ आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...