आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणीगावच्या आरोग्याची ‘हमी’ही कुपोषित, 7 गावांमधील आदिवासी आरोग्यसेवेला मुकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणीगाव येथील फिरत्या आरोग्य केंद्राची इमारत तीन आठवड्यापासून अशी कुलूप बंद आहे. - Divya Marathi
राणीगाव येथील फिरत्या आरोग्य केंद्राची इमारत तीन आठवड्यापासून अशी कुलूप बंद आहे.
धारणी - कुपोषण, मातामृत्यू आणि उपचाराच्या सोयीअभावी मेळघाटातील आदिवासींचे बिघडलेले आरोग्य अनेक वर्षांपासून ‘सुदृढ उपचार’ सुरू असतानाही पुर्णपणे सुधारू शकले नाही, हे येथील वास्तव आहे. 

मनुष्यबळ, अपुऱ्या साधनांमुळे आरोग्य यंत्रणेची स्थिती खंगलेल्या अवस्थेत असताना धारणीपासून सुमारे ६५ कि. मी. अंतरावरील दुर्गम भागातील आदिवासींना आरोग्याची हमी देणाऱ्या राणीगाव येथील फिरत्या आरोग्य पथकाचे रुग्णालय सुमारे तीन आठवड्यांपासून कुलूपबंद असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे भर पावसाळ्यात राणीगावसह कंजोली, सिनबन, गोलाई, मोथाखेडा, तलाई रेल्वे, वाण रेल्वे या सात गावांमधील नागरिकांना देलेली आरोग्याची ‘हमी’ सुद्धा ‘कुपोषित’ ठरली आहे. 

आरोग्य विषयक पायाभूत सेवा बळकटीकरणासाठी दुर्गम भागातील गरजू रुग्णापर्यंत थेट शासनाच्या आरोग्य सेवेची हमी नुकतेच मेळघाटाच्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली होती. सातपुड्यात गुंजलेले आरोग्यमंत्र्यांच्या या हमीचे आश्वासन जंगलात विरण्यापुर्वीच दुर्गम राणीगाव येथील फिरत्या आरोग्य केंद्राचे रुग्णालय तीन आठवड्यांपासून कुलूपबंद आहे. 

मेळघाटात यंत्रणेच्याच दुर्धर आजारामुळे अद्यापही कुपोषण, मातामृत्यूचे आव्हान संपुष्टात येऊ शकले नाही. दुर्गम, रस्ते, प्रशासकीय अडचणी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धारणीत काम करण्याची नसलेल्या इच्छाशक्तीमुळे आदिवासीपर्यंत अद्यापही आरोग्याच्या सुविधा पोहचू शकत नसल्याचे वास्तव आहे. त्यातच आरोग्य यंत्रणांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसताना विपरीत परिस्थितीत कर्तव्य बजावावे लागत असल्याची दुसरी बाजू आहे. अशा भीषण अवस्थेत राणीगाव येथील फिरत्या पथकाच्या रुग्णालय सुमारे तीन आठवड्यापासून कुलूपबंद आहे.परिणामी अितदुर्गम भागातील राणीगावसह कंजोली, सिनबन, गोलाई, मोथाखेडा, तलाईरेल्वे, वाण (रेल्वे ) अशा एकूण सात खेडयापाडयांतील तब्बल साडे पाच हजार आदिवासींना आरोग्यसेवेला मुकावे लागत आहे. 

आरोग्याची हमी घेणारे फिरत्या पथकाच्या रुग्णालयात शासनाने दर्जेदार सेवा मिळावी म्हणून प्रशस्त सुसज्ज इमारत, अत्याधिक उपकरणे, कर्मचारी वैद्यकीय निवास, तत्पर रुग्णसेवा रुग्णांना मिळावी म्हणून सतत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या रुग्णालयालाच कुलूप लागल्यामुळे आदिवासी रुग्ण, निवासी शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुली -मुलांसह जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांच्या आरोग्याची हमी देणारी आरोग्य तपासणी ठप्प पडली आहे. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थी - विद्यार्थिनी हिवताप, मलेरिया सारख्या विषाणूजन्य तापाने तर कुणी अतिसार सारख्या जिवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याच्या तक्रारी येथील शिक्षकांनी गावकऱ्यांनी फिरते पथकाचा बंद केलेला दवाखाना पाहण्यासाठी गेलेल्या तक्रार निवारण देखरेख नियोजन समितीच्या तसेच राज्यस्तरीय आरोग्य महासंघाच्या सदस्यांजवळ व्यक्त केल्या. सीबीएम प्रोजेक्टचे तालुका समन्वयक सोमेश्वर चांदूरकर यांनी २८ जून रोजी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन राणीगाव येथील फिरत्या पथकाचे केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. 
 
आश्रम शाळेतील मुलींची आरोग्य तपासणी नाही: राणीगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्यावतीने मुलींची निवासी आश्रमशाळा आहे. येथील मुलींची दर पंधरवाड्याने तपासणी करणे आवश्यक असते. परंतु तब्बल दोन महिन्यांपासून येथील मुलींची तपासणीच झाली नसल्याचे गंभीर बाब राणीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जयराम सावलकर यांनी सांगितले. त्यामुळे पथकाअभावी येथील विद्यार्थीनीच्या तपासणीचाही गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे. 
 
नमुने तपासणीही बंद: मेळघाटातदरवर्षी पावसाळ्यात आरोग्याची स्थिती गंभीर होत असते. दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजार, पुर पाऊस, रस्त्याअभावी आरोग्यसेवा दुर्गम भागात पोहचू शकत नसल्याने आदिवासींच्या समस्यांत मोठी भर पडत असते. फिरते पथकच गायब झाल्याने क्षारसंजीवनी पाणी, निज॔ंर्तुकीकरण पाणी नमुने तपासणी कार्यक्रम गावात होत नसल्याने दुषित पाण्यामुळे राणीगाव, कंजोली, सिनबन, गोलाई, मोथाखेडा, तलाईरेलवे, वाण (रेल्वे ) साथरोगाची शक्यता नाकारता येत नाही. 
 
केंद्राबाबत चौकशी करतो 
- आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान काही डाॅक्टरांना इतर आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते. परंतु राणीगावच्या केंद्राबाबत तालुका अधिकाऱ्यांशी बोलून चौकशी करतो.’’
-डॉ. नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी,अमरावती.
 
२४ तास सेवा देणे बंधनकारक 
फिरत्या पथकाच्याआरोग्य केंद्रात चोवीस तास सेवा देणे बंधनकारक आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत मुख्यालय सोडता येत नाही. असे असताना तीन आठवड्यापासून या केंद्राला कुलूप लागल्याने समस्या निर्माण झाली आहे.’’
- सोमेश्वर चांदूरकर, तालुका समन्वयक, सीबीएम प्रोजेक्ट. 
 
तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सेविकेची नेमणूक 
फिरत्या पथकाच्या रुग्णालयातील डाॅ. धर्मेंद्र नारनवरे यांना धुळघाट येथे पाठविण्यात आले असल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी सांगितले. परंतु दवाखाना बंद असल्याची माहिती मिळालेली नव्हती. पण कालच काही स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारयांनी लेखीपत्र देवून सुचित केल्यामुळे जिल्हा पातळीवर कळविण्यात आले आहे. 
आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तात्पुरता स्वरुपात आरोग्य सेविका आरती भीलावेकर यांना खाऱ्याटेंब्रू येथून राणीगाव येथे प्रतिनियुक्तीचे आदेश दिले आहेत. दवाखान्याची रुग्णवाहिका वाहन चालकालाही काही कारणास्तव धुळघाट (रेल्वे ) प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे. भरारी पथकाच्या दवाखान्यात परिचराचे पद रिक्त आहे. या भागातील रिक्त पदाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...