आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी प्रगतिशील, महत्त्वाकांक्षी... पण भांडवल नसल्याने आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वाशीम जिल्ह्यातील जऊळका (रेल्वे) येथील शेतकरी दत्तराव उर्फ गुड्डू आत्माराम लांडगे या शेतकऱ्याने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्तराव हे पदवीधर होते, प्रयोगशील होते. तरीही भांडवल उपलब्ध होत नसल्याचे सांगत त्यांनी आत्महत्या केली. तशा आशयाचे लांडगे यांचे पत्र ‘दिव्य मराठी’च्या शनिवारच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. यातून शेतकरी आत्महत्येचा एक वेगळा पैलू समोर आला आहे. आतापर्यंत नापिकी, कौटुंबिक कलह, नैसर्गिक संकट, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत होते. मात्र, दत्तराव यांनी मुख्यमंत्र्यांसह आपल्या कुटुंबीयांना लिहिलेल्या पत्रात आत्महत्येचे कारण भांडवल उपलब्ध नसल्याचे लिहिल्याने प्रशासकीय यंत्रणांसोबतच कृषी, अर्थ तज्ज्ञांमध्येही अस्वस्थता आहे.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतीच्या बिकट अवस्थेबद्दल बोलताना ‘धन निर्माताच निर्धन का?’ असा सवाल उपस्थित केला होता. लांडगे यांच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा या धन निर्मात्याच्या आत्महत्यांच्या मूळ कारणावर चर्चा सुरू झाली आहे. कोणताही व्यापार, व्यवसाय, उद्योग सुरू करताना भांडवल हाच महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, शेतीबाबत या मुद्द्याचा अद्याप का विचार केला गेला नाही. श्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र असणाऱ्या या कृषिप्रधान महाराष्ट्रात काळाच्या ओघात श्रेष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हे सूत्र अवलंबण्यास कधी प्रारंभ झाला हे शोधण्याची आणि त्याच्यावर विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. लांडगे यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर पुन्हा एकदा शेती आणि भांडवल यांची सांगड कशी घालावी या विवंचनेत कृषी, अर्थतज्ज्ञ आहेत. तर दुसरीकडे या घटनेनंतर प्रशासनाचेही डोळे उघडले आहेत. ‘दिव्य मराठी’ने राज्यातील काही कृषी, अर्थतज्ज्ञांशी याविषयी चर्चा केली. भांडवल हेच आत्महत्यांचे मूळ कारण असल्याचे त्यांनीही मान्य केले आहे.

जागतिकीकरणाचा फटका
साधारण १९९० च्या दशकापर्यंत शेतकऱ्यांना शेतीत फारसे भांडवल गुंतवावे लागत नसे. मात्र, यानंतरच्या काळात जागतिकीकरणाच्या कचाट्यात शेतकरी अडकत गेला. शेतीतील उत्पादनापासून ते थेट बाजारात मालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्याला शोषणाच्या विविध टप्प्यांचा सामना करावा लागत आहे. शेतीत पेरणी करण्यापासून शेतकऱ्याच्या शोषणाची ही मालिका सुरू हाेते. मजूर, दलाल, व्यापारी, आडते या साऱ्यांच्या शोषणातून शेतकऱ्याला तावून सुलाखून जावे लागत असल्याने शेतकऱ्याची भांडवल व्यवस्थाच काेलमडल्याचे कृषी, अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
शेतीत सातत्याने गुंतवणूक, बचत कमी
इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत शेतीत शेतकऱ्याला सातत्याने गुंतवणूक करावी लागत असल्याचे कृषी, अर्थ अभ्यासक राम देशपांडे म्हणाले. गुंतवणुकीच्या या फेऱ्यांमुळे शेतकरी बचत ठेवू शकत नसल्याने सातत्याने भांडवलावर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. तर शेतकऱ्यांची बचत कुणी लुटून नेतेय का हे गांभीर्याने पाहण्याची गरज चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली अाहे. सहकारी बँका सक्षम नाहीत व राष्ट्रीय बँकांच्या नियमांच्या कचाट्यात शेतकऱ्याला अडकायचे नाही म्हणून शेतकरी या बँकांकडे जात नसल्याचे गिरधर पाटील म्हणाले.
कर्जबाजारीपणा, तत्सम स्थिती घातक : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची अनेक कारणे सांगितली जातात. मात्र, भांडवल हेच मुख्य कारण असून, नापिकी, कर्जबाजारीपणा, बँका व सावकाराचे कर्ज हे त्या कारणाचे परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यत शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण असलेल्या भांडवल या विषयाकडेच मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.