आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या तापमानात अचानक 4.8 अंशाने घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील तापमानात गत दोन दिवसांपासून सातत्याने घट होत असून आज रात्रीच्या तापमानात अचानक ४.८ अंशाने घट झाली. पारा खाली आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्याप्रमाणे रात्री गारवा वाढला तसेच दिवसाचे तापमानही कमी झाले आहे. त्यामुळे हनुमान जयंतीचा आजचा दिवस उत्साहात गेला.

आणखी एक-दोन दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी विज्ञान महाविद्यालय, हवामान शास्त्र विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे. सकाळी ११ ते सायं. पर्यंत उन्हाचे चटके बसतात मात्र त्यानंतर फारशी गर्मी जाणवत नाही. गत तीन दिवसांपासून हे असेच वातावरण आहे. रात्री कुलर लावला की थंडी वाजायला लागते. त्यामुळे कुलरही बंद करावा लागतो.
 
ओडिशा आसामात पाऊस सुरू असून एप्रिल महिन्यात गेल्या काही वर्षात प्रथमच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. इशान्य भारतातही पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक ओडिशात चक्राकार वारे वाहत असल्याचा परिणाम विदर्भासह अमरावती शहरात जाणवत आहे. या भागातून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील तापमानात घट झाल्याचेही हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी सांगितले. उन्हाळ्यात अशाप्रकारचे वातावरण फारच कमी अनुभवास येते. मात्र यंदा वातावरणात सातत्याने बदल घडून येत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी चांगलेच कडक ऊन होते. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण , नंतर दुपारी उकाडा आणि रात्री काहीसा गारवा असे वातावरण होते.आता दिवस आणि रात्रीच्या तापमानात घट झाली आहे.
 
सध्याचे वातावरण फेब्रुवारीसारखे
सध्या असलेले वातावरण हे फेब्रुवारीच्या १५ तारखेनंतर असते तसे आहे. होळीनंतर पारा हळुहळू वर सरकण्यास सुरुवात करतो. परंतु, वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे तापमान घटले आहे. आणखी दोन ते तीन दिवस अशाच प्रकारचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...