आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुबगावमध्ये नऊ जणांवर हल्ला; जखमी झालेल्या लांडग्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सायाळच्या काट्यांनी जखमी होऊन चवताळलेल्या लांडग्याने दोन गावांत धुमाकूळ घालून केलेल्या हल्ल्यात तब्बल नऊ जण जखमी झाले, तर दोन जखमींची प्रकृती गंभीर अाहे. ही घटना शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथे सकाळच्या सुमारास घडली आहे. दरम्यान गावकऱ्यांनी या लांडग्याला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. दरम्यान, सायाळच्या काट्यांमुळे गंभीर जखमी झालेल्या या लांडग्याचा मृत्यू झाला आहे. 
 
हनुमानजी महादेवराव भोयर (६९), कांताबाई हनुमानजी भोयर (६०, दोघेही रा. पहूर), अनिल नारायण तामखाने (४५), अशोक किडूजी चिकी (३०), संजय मोतीरामजी मुंडवाईक (४५), वच्छलाबाई मोतीरामजी मुंडवाईक (६२), अशोक निंबाळे (३५) सलीम शेख (४०) आणि दीपक प्रभाकर दिवेकर (३५, सर्व रा. फुबगाव) असे लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. शनिवारी सकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास एका लांडग्याने फुबगावात प्रवेश करून अशोक निंबाळे यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. त्याचवेळी गावातील संजय मुंडवाईक हे निंबाळे यांच्या घराजवळ पोहोचले. मुंडवाईक स्वत:च्या घरी परत आले. त्यावेळी त्यांची आई वच्छलाबाई अंगणात पाणी टाकत असताना तोच लांडगा अचानकपणे त्या ठिकाणी आला त्याने वच्छलाबाईच्या अंगावर झेप घेत त्यांचा गाल फाडला. आईला वाचवण्यासाठी गेलेले संजय यांच्याही पोटावर त्याने हल्ला केला. त्यामुळे संजय सुद्धा जखमी झाले आहेत. दरम्यान, १५ मिनिटांनी गावातीलच अनिल तामखाने हे घराबाहेर हातपंपाजवळ दात घासत उभे असताना त्यांच्यावरही याच लांडग्याने हल्ला चढवला. यामध्ये अनिल यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अशोक किडूजी चिकी यांनाही चावा घेतला, तर दीपक दिवेकर यांच्यावरही दात घासत असतानाच हल्ला केला. सलीम शेख हे गावालतगच्या एका शेतात निंब तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर याच लांडग्याने त्यांच्या बोटाला चावा घेतला. 

ऐन भाऊबिजेच्या दिवशी अचानकपणे ग्रामस्थांवर लांडग्याने हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, गावातील सात जणांना चावा घेतल्यामुळे ‘लांडगा आला लांडगा’ ही बातमी संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे गावातील मंडळींनी हातात लाठ्या काठ्या घेऊन या लांडग्याचा शोध सुरू केला होता. वन विभागालाही माहिती दिली होती. त्यामुळे वन विभागाचे बचाव पथक गावात पोहोचले होते. तत्पूर्वी ग्रामस्थांनी या लांडग्याला पकडले होते. त्यानंतर वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र लांडगा सुद्धा जखमी होता. त्याच्या शरीरात विविध ठिकाणी सायाळचे काटे रुतलेले होते. त्याच्या जिभेत सायाळचा काटा असल्यामुळे तो चवताळला होता. त्यामुळेच त्याने हल्ला चढवल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 
 
रखवालदार भोयर दाम्पत्य झाले जखमी : फुबगावात हैदोस घातल्यानंतर हा लांडगा जंगलाच्या दिशेने पसार झाला. फुबगाववासीयांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र त्यानंतर दोन किमी. अंतरावरच फुबगाव ते वाई मार्गावर असलेल्या एका गिट्टी खदानवर पहूर येथील रहिवासी हनुमान भोयर त्यांच्या पत्नी कांताबाई हे दाम्पत्य रखवालदारीचे काम करण्यासाठी त्याच ठिकाणी एका खोलीत राहतात. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कांताबाई खोलीच्या बाहेर उभ्या होत्या. त्याचवेळी लांडग्याने त्यांच्यावर धाव घेतली. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांच्या बचावासाठी आलेले हनुमान भोयर यांच्या उजव्या डोळ्यावर तसेच कपाळावर लांडग्याने गंभीर दुखापत केली आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नागपूर पाठवण्यात येणार आहे. 
 
लांडग्याचा झाला मृत्यू 
हल्लाकरणाऱ्या लांडग्याला सायाळचे काटे रुतले होते. त्यामुळे तो चवताळला होता. त्याला उपचारासाठी अमरावतीत घेऊन येताना त्याचा मृत्यू झाला. या लांडग्याचे शनिवारी सायंकाळीच शवविच्छेदन करून मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावली. 
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर, आरएफओ, वडाळी. 
 
भुरकट रंगामुळे वाटला श्वान 
फुबगाववासीयांना शनिवारी पहाटेच एका लांडग्याचा सामना करावा लागला. हा लांडगा एखाद्या मोठ्या श्वानाप्रमाणेच दिसत होता. त्याचा रंग सुद्धा भुरकट असल्याने सुरुवातीला अनेकांना तो श्वान वाटला. मात्र त्याने नऊ जणांवर हल्ला केल्याने तो श्वान नसून लांडगा असल्याचे पुढे आले. 
बातम्या आणखी आहेत...