आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी कन्येच्या विवाहासाठी आज व्हीव्हीआयपींची वर्दळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उद्या रविवारी नागपुरात व्हीआयपींची वर्दळ राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह काही नेते शनिवारीच नागपुरात दाखल झाले असून बहुतांशी नेत्यांचे उद्याच आगमन होणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा दौरा मात्र रद्द झाला आहे.

गडकरी कन्या केतकी हिचा विवाह उद्या आदित्य कासखेडीकर याच्याशी होणार आहे. आदित्य हा अमेरिकेत फेसबुक कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहे. वर्धा मार्गावरील एम्प्रेस सभागृहात रविवारी सकाळी हा विवाह सोहळा पार पडेल. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह काही नेत्यांचे शनिवारीच नागपुरात आगमन झाले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, मनेका गांधी यांच्यासह तब्बल आठ राज्यांचे मुख्यमंत्री रविवारी नागपुरात आहेत. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारीही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या विवाहाच्या निमित्ताने भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दोन स्वागत समारंभ यापूर्वीच पार पडले. उर्वरित दोन स्वागत समारंभ नागपूर आणि दिल्लीत आयोजित करण्यात आले असून दिल्लीतील स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेते तसेच उद्योगपतींचा सहभाग राहणार आहे.
अमित शहांचा दाैरा अचानक रद्द
विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा दौरा जवळपास निश्चित झाला होता. पण शनिवारी त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजले. या विवाह सोहळ्यास तब्बल ८ राज्यांचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य येणार असल्याने वर्धा मार्गावरील एम्प्रेस सभागृहाकडे माध्यमांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...