आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ तालुकास्तरीय क्रीडा संकुलांत अधिकारीच नाहीत, उत्तम खेळाडू निर्मितीच्या शासन उद्देशाला हरताळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीणभागात अनवाणी पायाने खेळणाऱ्या खेळाडूंची प्रतिभा हेरून त्यांच्या गुणांना चालना देत राष्ट्रीय खेळाडू घडावे या उद्देशाने काेट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलं उभी करण्यात आली. परंतु, ही संकुलं चालवण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक नसल्याने तसेच शासकीय अनास्थेमुळे या संकुलांचा खेळाडू घडविण्यासाठी उपयोगच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंच्या गुणांना या संकुलातून चालनाच मिळत नसल्याने क्रीडा संकुलांचा उद्देश फसल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. सोबतच संकुलांची दुरवस्था होत आहे. 

क्रीडा नगरी अशी ख्याती असलेल्या अमरावती शहरासह जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील खेळाडू खेळांचा विकास व्हावा म्हणून १४ पैकी तालुक्यात उभारण्यात आलेल्या बहुतांश तालुका क्रीडा संकुलात अधिकारी, प्रशिक्षक काळजीवाहू कर्मचारीच नाहीत. तसेच शासनाद्वारे या कर्मचाऱ्यांची गत काही वर्षांपासून नियुक्तीच झाली नाही. आधी काळजीवाहू कर्मचाऱ्यांसाठी शासनाद्वारे मानधन दिले जात होते. परंतु, आता तेही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ही संकुलं ओस पडली असून तेथील क्रीडा साहित्यावर गंज चढत आहे. काही संकुलांचा लाभ ज्या खेळाडूंनी घ्यायला हवा त्यांना होता इतरांनाच होत आहे. 

तालुका क्रीडा संकुलं उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळत असते. याअंतर्गत संकुलाची इमारत, २०० मी. ट्रॅक, क्रीडा साहित्य, वीज, पाण्याची सोय आणि काळजीवाहू कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तालुका क्रीडा अधिकारी शासनाद्वारे नियुक्त केले जातात. यांच्याकडे संकुलाच्या संपूर्ण कार्यभाराची जबाबदारी असते. परंतु, गत काही वर्षांत तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची शासन स्तरावरून नियुक्तीच झाली नाही. 

मानधन येणे बंद झाल्यामुळे काळजीवाहू व्यक्ती जसे सुरक्षा रक्षकही नियुक्त करणे शक्य नाही. त्यामुळे या संकुलांची दुरवस्था झाली आहे. ही संकुलं नष्ट होण्याआधी शासनाने जर जबाबदारी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही तर कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. 

शासन सध्यातरी तालुका क्रीडा अधिकारी नियुक्त करण्याच्या मनस्थितीत नसून कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षकाचे मानधन देण्यास इच्छूक नाही. त्यामुळे ही संकुलं सध्या ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत ठेवण्यासाठी त्यांची जबाबदारी करार पद्धतीने खासगी संस्था किंवा संघटनांकडे देण्यात यावी. याद्वारे शासनाला उत्पन्नही मिळेल तसेच खेळ आणि खेळाडूंच्या विकासाचे अडलेले गाडे पुढे सरकेल. दोन्ही उद्देश सफल होतील, असे मत बहुतांश तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

राज्यासह देशाच्या क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करुन आपल्या गुणवत्तेचे उत्कृष्ट दर्शन घडवणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तालुक्याच्या पातळीवर असलेल्या क्रीडा संकुलाची ही दुरवस्था नवीन पिढीसाठी निश्चितच मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अामदारांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी आमदारांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची स्थिती विचारात घेता दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि अचलपूर या नऊ ठिकाणी तालुका क्रीडा संकुलं असून काही ठिकाणी २०० मी. ट्रॅकही आहे. त्याचप्रमाणे ४०० मी. ट्रॅकसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. धारणी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर असून भातकुलीतील संकुलासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अमरावती चिखलदरा येथे जागा मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून अंजनगाव सुर्जी येथे मात्र अद्याप जागाच मिळाली नाही. 
 
जबाबदार व्यक्तीच्या नियुक्तीची प्रक्रिया 
सध्या जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तालुका क्रीडा संकुलांमध्ये तालुका क्रीडा अधिकारी काळजीवाहू कर्मचारी जसे शिपाई, रक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच यासंदर्भात कारवाई होईल.’’ गणेशजाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी 

आमदार आहेत क्रीडा संकुलाचे अध्यक्ष 
शासनाच्या निर्णयानुसार तालुक्याचे आमदार हे तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असतात. त्यांच्यावर या क्रीडा संकुलांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संकुलाचा विकासाबाबत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार असतो. तर तालुका क्रीडा अधिकारी हे सचिव असतात. विशेष बाब अशी की, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सहसचिवपदाची जबाबदारी असते. जिल्ह्यातील नऊ क्रीडा संकुलं बांधून उभी असली तरी तेथे जबाबदार अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे या संकुलांची स्थिती सध्या वाईट आहे. 
बातम्या आणखी आहेत...