आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: शेतकरी कर्जमाफीचे श्रेय कुणा एकाचे नाही : आमदार बच्चू कडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार बच्चू कडू. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार बच्चू कडू.
यवतमाळ : शेतकरी कर्ज माफीसाठी राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासोबत शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शेतकरी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडी घेतली. त्यांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देत सहकार्य केले. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा झाली. त्यामुळे कर्जमाफी हे कुण्या एकट्याचे श्रेय नाही आणि ते श्रेय लाटण्याचा कुणी प्रयत्नही करू नये, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
राज्यात स्थापन केलेल्या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या आंदोलनामुळे कर्जमाफीच्या निर्णयात अल्पभूधारक शेतकऱ्यांचा फायदा झाला. कर्ज माफीसंदर्भात बँकांना केवळ राज्याचे निर्देश आले आहेत. मात्र अद्याप त्यांना आरबीआयचे निर्देश नाही. त्यामुळे त्यांच्या निर्देशाची आवश्यकता आहे.
 
कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनाही कारखान्यांना मदत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत सर्वांकडून शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे. या लुटीतून शेतकऱ्याला बाहेर पडायचे असेल, तर त्याने हातात नांगर पकडून डोक्यात असलेली विविध पक्षांची गुलामी दूर केली पाहिजे. 
 
आज शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. वाघ वाचवण्यासाठी शासनाने अमिताभ बच्चन यांना पुढे आणले. मात्र शेतकऱ्याला वाचवण्यासाठी काय केले. बेंबळा प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी मासेमारीचे काम देण्याऐवजी तो कंत्राट दुसऱ्या जिल्ह्यातील सोसायट्यांना देण्यात येतो.
 
हा अन्याय खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पगस्तांना त्या ठिकाणी मासेमारी करण्याचा पहिला अधिकार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले. स्वामिनाथन आयोगासाठी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे आमदार कडू म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, शहराध्यक्ष तुषार भोयर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
 
सरकारची भीती काढण्यासाठी बॉम्बची भाषा 
नाशिकच्या मेळाव्यात शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यात प्रचंड भीती होती. ती सरकारची भीती दूर करण्यासाठी त्या ठिकाणी बॉम्ब टाकू असे बोललो. भगतसिंग यांनी केवळ आवाज करणारा बॉम्ब टाकला होता, तो कुणाला इजा करणारा नव्हता. मात्र भाजपवाल्यांनी केवळ नथ्थुराम घोडसे यांचा इतिहास वाचला, त्यांना भगतसिंगांचा इतिहास माहिती नाही. हे इकडे शेतकऱ्यांना साले म्हणतात, मग बॉम्बला का घाबरतात, असेही आमदार कडू म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...