अमरावती - दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याने संतप्त युवकाने दुसऱ्या युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. ही घटना विलासनगर भागात गुरूवारी (दि. १२) दुपारी घडली असून, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.दरम्यान, जखमी युवकार इर्विनमध्ये उपचार सुरू आहेत. अवधूत रामचंद्र वरघट (३२, रा. रमाबाई आंबेडकरनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अन्नू बाळू दुर्योधन (२३, रा. कपिलवस्तूनगर) या हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.
अवधूत वरघट गुरूवारी दुपारी वाजताच्या सुमारास विलासनगर भागातून जात होते. त्याचवेळी अन्नू हा त्यांना भेटला त्याने अवधूत यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. अवधूत यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले असल्यामुळे ते अंत्यसंस्कार आटोपून घराकडे परत येत होते. त्याचवेळी अन्नूने त्यांना पैसे मागितले असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे अन्नूने वस्तऱ्याखारखे शस्त्र काढून अवधूत यांच्या गळ्यावर वार केला. हा वार इतका गंभीर होता की, अवधूत घटनास्थळीच कोसळले. अवघ्या काही क्षणातच त्यांचे संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात भिजले. या हल्ल्यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसरीकडे गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. अन्नूविरुध्द यापुर्वीसुध्दा गुन्हा दाखल असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान अवधूत यांना इर्विनमध्ये आणल्यानंतर परिसरातील शेकडो नागरीकांनी इर्विनमध्ये गर्दी केली होती. यावेळी इर्विनमध्ये एसीपी मिलिंद पाटील, गुन्हे शाखेचे पीआय आत्राम त्यांचे पथक पोहचले होते. क्षुल्लक कारणांवरून प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण शहरात अलिकडे वाढले आहे.