आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांच्या विरोधात आता संयुक्त मोहिम, माहितीचे नियमित आदान-प्रदान करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचा दबाव वाढला की नक्षलवाद्यांची फौज महाराष्ट्राकडे सरकते तर महाराष्ट्रातून दबाव वाढल्यावर ते पळून जाण्यासाठी छत्तीसगडच्या दुर्गम जंगलांचा आधार घेतात. व्यर्थ जाणाऱ्या मोहिमांमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांनी सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात नियोजनबद्ध संयुक्त मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा दावा नक्षल विरोधी अभियानातील सूत्रांनी केला आहे. 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात नागपुरात पार पडलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र अशा आंतरराज्य बैठकीनंतर आता या तीनही राज्यांमध्ये समन्वयासाठी कनिष्ठ स्तरांवर बैठका सुरु असून ,अलिकडेच छत्तीसगड येथे पार पडलेल्या आंतरराज्य बैठकीत नक्षलवाद्यांच्या विरोधात संयुक्त मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीची सीमा छत्तीसगडच्या बस्तर, जगदलपूर, राजनांदगाव अशा जिल्ह्यांना लागून आहेत. त्यातल्या त्यात छत्तीसगडमधील वनक्षेत्र प्रचंड मोठे असल्याने तेथे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकूश ठेवण्यात स्थानिक सुरक्षा दलांना पुरेसे यश येत नसल्याचे दिसून आले आहे. तेथे सुरक्षा दलांचा दबाव वाढला की नक्षलवाद्यांच्या फौजा घनदाट जंगलांकडे आश्रयाला येतात. बऱ्याचदा ते महाराष्ट्राच्या सीमेतील जंगल क्षेत्रात येऊन तेथेही कारवाया पार पाडतात. दरम्यान मागील अनेक वर्षांपासूनच्या या समस्येवर नियोजनबद्ध संयुक्त मोहिमा हेच उत्तर असल्याचा निष्कर्ष आंतरराज्य बैठकीत काढण्यात आला. त्यावर उपाय म्हणून नक्षलवाद्यांच्या कारवायांबाबत माहितीचे नियमित आदान -प्रदान त्यानुसार ठरवून संयुक्त मोहिमा आखण्यावर आता भर दिला जाणार आहे. 

या माध्यमातून नक्षलवाद्यांवर दबाव वाढवून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्याची महाराष्ट्र पोलिसांची रणनिती आहे. त्याला छत्तीसगड मधून पुरेशी साथ मिळाल्यास प्रभावी कामगिरी पार पाडता येईल, यावर दोन्ही राज्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती नक्षल विरोधी अभियानातील सूत्रांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...