आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यांवर राहणार आता ‘सीसीटीव्ही’ची निगराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अन्यायाविरुद्ध तक्रार नोंदवून दाद मागण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यास त्याला सौजन्याची वागणूक मिळेलच याची शाश्वती नसते. काही पोलिसांची अरेरावी राब टाकून बोलण्याने तक्रारकर्ता मदत मागण्याआधीच गार होण्याचा कटू अनुभव अनेकांच्या गाठीशी आहे. परंतु, आता पोलिस ठाण्यांमधील घडामोडींवर अचूक लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अायुक्तांनी शहरातील दहाही ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. शुक्रवारपासून (दि. १०) आयुक्तालयातील सर्वच ठाण्यांवर कॅमेऱ्यांची निगराणी सुरू झाल्याने ठाण्यांमध्ये गोंधळ घालणाऱ्यांपासून तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवरही चांगलाच वचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पोलिस आयुक्तालयातील दहा ठाण्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर कोतवाली राजापेठ या दोन ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले होते. दरम्यान, आता उर्वरित आठही ठाण्यात सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कॅमेरे लागावेत यासाठी प्रयत्न केले ते शक्य झाले आहे. त्यामुळे १० जूनपासून आयुक्तालयातील सर्वच ठाण्यांवर कॅमेऱ्यांची निगराणी सुरू झाली आहे.

आयुक्तालयातील कोतवाली राजापेठ हे दोन ठाणे वगळता नागपुरी गेट, खोलापुरी गेट, भातकुली, बडनेरा, वलगाव, फ्रेजरपुरा, नांदगावपेठ आणि गाडगेनगर या ठाण्यातही सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत झाले आहे. प्रत्येक ठाण्यांमध्ये किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामध्ये ज्या ठाण्यांत लॉकअप आहे, त्या ठाण्यातील लॉकअपमध्ये एक कॅमेरा, स्टेशन डायरी परिसरात तसेच ठाण्याच्या पुढील मागील बाजूला कॅमेरा लावण्यात आलेला आहे. या कॅमेऱ्यांची स्क्रीन ठाणेदारांच्या कक्षात ठेवण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांमुळे आता पोलिस ठाण्यातील बहुतांश भाग हा कॅमेऱ्यांच्या नजरेखाली येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे आता प्रत्येक ठाणे कॅमेऱ्यांच्या निगराणीत येणार आहे. ठाण्यात कॅमेरा लागल्यामुळे तक्रारदार अनेकदा पोलिसांवर आरोप करतात की, आम्हाला ठाण्यात तासन््तास बसवून ठेवण्यात आले. मात्र, कर्तव्यावरील पोलिस हे आरोप फेटाळून लावतात, तसेच काही गुन्हेगार पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करतात. मात्र, कॅमेरा असल्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपांची शहानिशा होऊन सत्य उजेडात येण्यास मदत होणार आहे. याव्यतिरिक्त पोलिसांवरही आरोपींवरही कॅमेऱ्यांची निगराणी राहणार आहे. एकंदरीत ठाण्यातील कामकाजात अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे. सर्वकाही आता कॅमेऱ्यांच्या निगराणीत येणार असल्यामुळे फायदा होणार आहे.

दहाही ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित
^आयुक्तालयातील दहाहीपोलिस ठाण्यात कॅमेरे बसवण्यात आले असून, ते कार्यान्वित झाले आहेत. कॅमेऱ्यांमुळे पोलिस ठाण्यातील घडामोडी त्यामध्ये रेकॉर्ड होतील. त्यामुळे पारदर्शक पोलिसिंग होण्यास मदत होणार आहे. मोरेश्वर आत्राम, पोलिसउपायुक्त.

चार दिवसांत लागले आठ ठाण्यातील सीसीटीव्ही
^आम्ही येण्यापूर्वी दोन पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही होते. उर्वरित आठ ठाण्यांत आम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून गत चार दिवसात सीसीटीव्ही लावून घेतले. कॅमेऱ्यामुळे पोलिसांना तसेच ठाणेदारांनाही महत्त्वाचे ठरणार आहे. दत्तात्रय मंडलिक, पोलिसआयुक्त.

कॅमेऱ्यामुळे होणारे फायदे
{ लॉकपमध्ये असलेल्या आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल. आरोपीला बाहेर केव्हा काढले, केव्हा आतमध्ये टाकले.
{लॉकअपमधील आरोपीला जेवण मिळाले की नाही, लॉकअप गार्डवर किती कर्मचारी कार्यरत आहे, ते कशाप्रकारे ड्युटी करतात हे पाहता येईल.
{ठाण्याच्या परिसरात कोण आले, कशासाठी आले, तो कोणाला भेटतो.
{तक्रारदार किती वाजता आला, त्याची तक्रार नोंदवल्या गेली किंवा नाही.
{ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी कसे काम करतात. काम करतात की गप्पा मारतात. यावर ठाणेदार स्वत:च्या कक्षातून नियंत्रण ठेवू शकतो.
बातम्या आणखी आहेत...