आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आण्विक तंत्रज्ञान वापराने भरघोस शेती उत्पादन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आण्विक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची रोग प्रतिकार शक्ती तसेच उत्पादन वाढविणाऱ्या विविध पिकांचे ४२ वाण मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले आहेत. देशभरात या वाणांचा उपयोग सुरू झाला आहे. या वाणांच्या वापरामुळे सुमारे २० ते २५ टक्क्यांनी पीक उत्पादन वाढत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.

आण्विक तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर होत असून, त्यात शेतीचाही समावेश आहे. बीएआरसीचा आण्विक शेती आणि जैवतंत्रज्ञान विभाग त्यासाठी कार्यरत आहे. वरिष्ठ वैज्ञानिक सचिन हजारे यांनी सांगितले की, शेतीचे स्वरूप वेगाने बदलत आहे. शेतकऱ्यांना अधिक रोगप्रतिकारक शक्ती, जास्त उत्पादन आणि उत्पादनमूल्य कमी करणारे वाण हवे असतात. त्या दिशेने बीएआरसीने प्रयत्न करून आण्विक तंत्रज्ञानाच्या वापरातून विविध पिकांचे ४२ वाण विकसित केले आहेत. त्यात प्रामुख्याने भूईमूग, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, धान अशा तेलबिया आणि कडधान्याच्या पिकांचा समावेश आहे. यात भुईमुगाचे सर्वाधिक १५ वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी काही अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित झाले आहेत.

बीएआरसीने विकसित केलेले वाण ट्रॉम्बे क्रॉप व्हरायटीज नावाने ओळखले जातात. या वाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात १५ ते २५ टक्के अथवा त्यापेक्षाही अधिक वाढ मिळत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये आण्विक शेतीचे तंत्रज्ञान पोहोचले असले तरी त्याचा अपेक्षित प्रसार झालेला नाही. नागपुरातील अॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या दालनात शेतकऱ्यांना आण्विक शेतीची माहिती देण्यात आली.

शेतकरी काय म्हणतात..
बीएआरसी चा हा दावा जाणून घेण्यासाठी आण्विक शेतीला प्राधान्य देणाऱ्या निवडक शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता या तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेल्या वाणांमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ मिळाल्याचे सर्वच शेतकऱ्यांनी मान्य केले. महाराष्ट्रात विशेषत: भुईमुगाच्या वाणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शेतकरी रवींद्र दप्तरी यांनी मागील काही वर्षांपासून बीएआरसी च्या मदतीने भुईमुगाचे बियाणे तयार करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. भुईमुगाचे टीएसी-२४ वाण सर्वात लोकप्रिय असून, आजवर दोनशे ट्रक बियाण्यांचा पुरवठा आम्ही केल्याचे दप्तरी यांनी सांगितले. भुईमुगाचे हे वाण उन्हाळी पीक आहे. ते ९० दिवसातच येते व झाड उपटल्यावर त्याच्या मुळाशी शेंगांचे मोठाले झुपके दिसून येतात. झाड फार वाढत नसल्याने मजुरी कमी लागते. या वाणांच्या वापरामुळे उत्पादनात २० टक्के अथवा त्यापेक्षाही अधिक वाढ मिळते. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, मध्य प्रदेशात हे वाण लोकप्रिय असल्याचे ते सांगतात. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील मधुकर घुगे (मोबाईल क्रमांक ९७६४९२८८१३) यांचाही असाच अनुभव आहे. २००१ पासून आम्ही बीएआरसी चे भुईमुगाचे वाण वापरतो. भुईमुगाचे चार हजार क्विंटलच्या वर बियाणे आम्ही वितरित केले. योग्य प्रमाणात लागवड केल्यास दुप्पट उत्पादनही घेता येते, असे घुगे सांगतात. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टनकोडोली येथील जयकुमार गुंडे (मोबाईल क्रमांक ९३२५११२३६७) यांच्या मते आण्विक प्रक्रियेतून आलेल्या बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी वाढ मिळते. विशेषत: भुईमुगाचे वाण फारच उपयुक्त आहे. झाडे ठेंगणी राहत असून, झाडाच्या मुळालाच शेंगा धरत असल्याने मजुरीचा खर्च कमी लागतो, असे ते सांगतात. या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हायला हवा, असेही गुंडे यांना वाटते.

पदार्थ टिकविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
दरम्यान, आण्विक तंत्रज्ञानाचा फळे, फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ तसेच इतर पदार्थांवरील कीड थोपवून ते अधिक काळ टिकवण्याच्या दृष्टीनेही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कांदे, बटाटे, हळद, मसाल्याचे पदार्थ तसेच अशा अनेक पदार्थांवर गॅमा विकीरणांची प्रक्रिया करण्याचे प्लांट लासलगावसह अन्य ठिकाणी आहेत. अमेरिकेत निर्यात होणारी फळे विकीरण प्रक्रिया करूनच पाठविण्याचा नियम असल्याने त्यासाठीही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

असे आहे तंत्रज्ञान
बियाण्यांवर गॅमा विकिरणांचा (रेडिएशन) मारा करून डीएनएमध्ये उत्क्रांती घडवली जाते. काही बियाण्यांतून रोप तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते तर काही बियाणे निरुपयोगी ठरतात. चांगल्या रोपांची निवड करून त्यातून उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांचा नंतर शेतात लागवडीसाठी वापर केला जातो.
बातम्या आणखी आहेत...