आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी उपेक्षित मुलींच्या हस्ते ध्वजारोहण, नागपूर महापालिकेचे निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शहरातील महापालिकेच्या सर्व १६२ शाळांमध्ये मुलींच्या हस्ते ध्वजाराेहण करण्याचा निर्णय पालिकेचे शिक्षण सभापती गोपाल बाेहरे यांनी घेतला आहे. असा निर्णय घेणारी नागपूर महापालिका राज्यातील पहिलीच महापालिका आहे. पालिका शाळांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या मुलींची यासाठी निवड करण्यात येईल. शिवाय, त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या पार्श्वभूमीवर मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतल्याचे बाेहरे यांनी सांगितले. महापौर प्रवीण दटके यांनाही मुख्यालयात मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची विनंती करणारे पत्र देण्यात आले. ते संजयनगर शाळेतील मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करतील. शिवाय शहरातील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समितीलाही पत्र देण्यात येईल.
महिलांचा अधिकार जपण्यासाठी...
महिला वा मुलींच्या मूलभूत अधिकारासाठीचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. ग्रामीण भागात सत्तेतील मुख्य पदांवर महिला असल्या तरी अधिकार मात्र पती किंवा तिच्या घरातील पुरुषच वापरत असल्याचे दिसून येते. विशेषत: १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला सरपंच महिलेऐवजी तिच्या पतीने ध्वजारोहण केल्याच्या बातम्याही नेहमी येतात. या पार्श्वभूमीवर पालिका शाळांमध्ये १५ आॅगस्टला विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले तर चांगला संदेश समाजात जाणार आहे.
खासगी शाळांनाही विनंती : शहरातील खासगी शाळांनाही शिक्षण विभागातर्फे मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी विनंती करण्यात येईल, असे बोहरे यांनी सांगितले. मुलींची निवड करण्यासाठी सोमवार ८ आॅगस्ट रोजी बैठक होत आहे.
बातम्या आणखी आहेत...