आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Man Died In Tanker Hit Incident, Woman Injured

टँकरच्या धडकेत एक ठार; महिला जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगाव पेठवरूनअमरावतीला येणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला, तर दुचाकीला कट लागून महिला खाली पडल्याने सुदैवाने ती बचावली. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौरी इन हॉटेलसमोर सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुुमारास घडली. अपघातानंतर टँकरचा चालक धडक देऊन पसार झाला. नारायण तायडे (५८, केशव कॉलनी) असे मृतकाचे नाव असून,जखमी संगीता वानखडे (३५, महेंद्र कॉलनी) यांच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृतक नारायण तायडे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते, तर जखमी संगीता वानखडे यादेखील त्याच महाविद्यालयात कार्यरत आहेत. दोघेही एकाच (एमएच २७ एएस ७२४८) दुचाकीवरून नांदगावपेठवरून अमरावतीच्या दिशेने महाविद्यालयात जाण्यासाठी येत होते. दरम्यान, महाविद्यालयात पोहोचण्यापूर्वीच गौरी इन हॉटेलसमोर हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामुळे पाठीमागे बसलेली ही महिला खाडी पडली. सुदैवाने या अपघातात ती थोडक्यात बचावली. मात्र, नारायण तायडे हे टँकरच्या मागच्या टायरमध्ये अाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याच मार्गावरून येत असलेल्या सज्जन गृहस्थाने आपली चारचाकी वाहन थांबवून दोन्ही जखमींना गाडीत बसवले. वेळेवर मदत मिळाल्याने सदर महिलेचे प्राण वाचले. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या या महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी पुंड हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेचा पंचनामा करून पुंड यांनी पुढील तपास करीत आहे.

डॉक्टराने दाखवली माणुसकी : धारणी तालुक्यातील भूलघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोरडे हे अपघात झाल्यानंतर त्याच मार्गाने अमरावतीला येत होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी लगेचच आपली कार थांबवून अपघातात जखमी पुरुष महिलेला आपल्या चारचाकी गाडीत बसवून उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणले. दरम्यान, या अपघातात पुरुषाचा जागीच मृत्यू झाला होता. परंतु, महिलेला वेळेवर रुग्णालयात आणण्यात आल्याने या महिलेचे प्राण वाचले.