आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 कोटी लाेकसंख्येच्या महाराष्ट्रात 81 जेनेरिक आैषधी दुकाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ब्रँडेड अाैषधांच्या ताेडीस ताेड असलेल्या मात्र अत्यल्प किमतीत उपलब्ध हाेणाऱ्या जेनेरिक अाैषधांना प्राेत्साहन देण्याची याेजना केंद्र सरकारने अाखली अाहे. त्यासाठी डाॅक्टरांना जेनेरिक अाैषधेच लिहून देण्याची सक्तीही केली जाणार अाहे.
 
असे असले तरी रुग्णांना जेनेरिक औषधे मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अाजघडीला संपूर्ण देशात केवळ १,१९४ अधिकृत जनऔषधी विक्री केंद्रे आहेत. यामध्ये सर्वाधिक १८४ संख्या केरळमध्ये असून सर्वात कमी केंद्रे मिझाेराममध्ये अाहेत. ११ काेटींहून अधिक लाेकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अशी अधिकृत केवळ ८१ जेनेरिक दुकाने अाहेत.
 
अाजघडीला शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम येथे जेनेरिक औषध विक्री केंद्रे नाहीत, तर खासगी मेडिकल शाॅपमध्ये जेनेरिक औषधे विक्रीस उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात जेनेरिक औषध विक्री नसणे तसेच उपलब्ध असलेली विक्री केंद्रे दूर अंतरावर असल्याने रुग्णही ब्रँडेड कंपन्यांचीच औषधे घेत असल्याचे दिसून आले आहे.
 
कठोरकारवाई आणि कडक कायदे हवे : यासंदर्भात महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे सदस्य डाॅ. अनिल लद्दड यांनी सांगितले की, मेडिकल शाॅप, औषध निर्मात्या कंपन्या, डाॅक्टर फार्मासिस्ट यांच्यासाठी कडक कायदे करून त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी. डाॅक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून दिलीच पाहिजे. त्याला अजिबात विरोध नाही. परंतु जेनेरिक औषध विक्री केंद्रात मुबलक साठा नसतो. शिवाय या केंद्रांची संख्या खूपच कमी आहे अाणि अनेकदा जेनेरिक शाॅपमध्ये काही औषधे स्वस्तात मिळत नाही, असे डाॅ. लद्दड म्हणाले. सिफ्रोफ्लाॅक्सासिन या जेनेरिक अँटिबायोटिक्स अाैषधाची स्ट्रिप १५-१६ रुपयांना येते. परंतु त्यावर एमआरपी ३८ रुपये असल्याने केंद्रचालक ३८ रुपयांना विकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
जेनेरिक अाैषधांची विभागवार केंद्रे
औरंगाबाद २७
पुणे १८
नागपूर १३
नाशिक १२
मुंबई ०७
कोकण ०४
एकूण ८१
 
केंद्रांची संख्या वाढवा
सर्वप्रथमजेनेरिक शाॅपीची संख्या वाढवावी आणि ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. यशवंत देशपांडे यांनी केली. अामच्या असाेसिएशनचे राज्यभरात ३५ हजार सदस्य आहे. त्यांना जेनेरिक लिहून देण्यास काहीच हरकत नाही. परंतु लिहून दिल्यावर ती अाैषधे मिळण्याची व्यवस्था व्हायला हवी, असे डाॅ. देशपांडे यांनी सांगितले.

नागपूरमध्ये चार दुकाने
जनमंच या स्वयंसेवी संस्थेने नागपूर शहरात चार जेनेरिक औषध विक्री केंद्रे सुरू केली आहेत. २५ ते ३० लाख लाेकसंख्येच्या नागपुरात फक्त चार विक्री केंद्रे कशी पुरणार, हा प्रश्न आहे. अमरावती येथेही एक जेनेरिक औषध विक्री केंद्रे जनमंचाने सुरू केली आहेत.
बातम्या आणखी आहेत...