आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरने नाकारल्याने गुप्तांचे यकृत, मुत्रपिंड मुंबई येथे नेले; अवयवदानाचा घेतला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ब्रेनडेड झालेल्या हमालपुरा येथील ५२ वर्षीय प्रॉपर्टी डीलर लाॅटरी व्यवसायी मनोज गुप्ता यांचे मुत्रपिंड आधी नागपुरातील डाॅक्टरांनी तेथील रुग्णांसाठी घेण्याची तयारी दर्शवली. त्यांना मुत्रपिंडाच्या चाचण्यांचे रिपोर्टही पाठवण्यात आले. मात्र ऐनवेळी नागपुरातील डाॅक्टरांनी मुत्र पिंड घेण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबईतील डाॅक्टरांनी दोन्ही मुत्रपिंड यकृत नेले. राज्याच्या राजधानीतील ज्युपिटर हाॅस्पीटलमध्ये चार रुग्णांवर या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांच्या रुपात मनोज गुप्ता जिवंत आहेत, अशी भावना डाॅक्टरांसह त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. डोळेही दोन रुग्णांना दिले जाणार आहेत. 
 
अवयव दानामुळे तुमचे वडील जिवंत आहेत. नाराज होऊ नका असे मनोज गुप्ता यांचा मुलगा कुणाल तसेच मुली वैष्णवी, खुशबू यांना समजावले. त्यामुळे त्यांनी अवयव प्रत्यारोपण अर्जावर लगेच स्वाक्षरी केली. दु:खद घटना आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. मात्र या अवयवदानामुळे काही कुटुंबांना सुखाचे क्षण मिळणार आहेत. समाज देशाला मनोज यांनी बरेच काही दिले आहे. त्यांचे कुटुंबीय खरे सुशिक्षित आहेत. यामुळे सहा माणसांना जीवन मिळाले, अशी भावना डा. चौधरी यांनी व्यक्त केली. 
 
चुकीचे औषध घेतल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मनोज यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्ण कृत्रिम श्वसनावर होता. हृदय सुरू होते. मात्र श्वसनक्रीया सुरू नव्हती. रक्तदाबही व्यवस्थित नव्हता. त्यानंतर रुग्णाला माझ्या रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांच्या आग्रहास्तव दाखल केले. ४८ तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर डाॅक्टरांना काही आशा दिसू लागली. कारण मनोज यांच्या शरीरातील काही अवयव काम करायला लागले होते. यादरम्यान दोनदा हृदयविकाराचा धक्का रुग्णाला बसला होता. तरी हृदय सुस्थितीत ठेवले. हृदय प्रत्यारोपित व्हावे म्हणून आम्ही प्रयत्न केले. 

5 दिवसांनंतर आम्हाला ब्रेनडेडची लक्षणे दिसू लागली. चाचण्या ९० टक्के ब्रेनडेड दाखवत होत्या. कुटुंबियांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनीही समजून घेतले. याला इर्रिव्हर्सिबल ब्रेन डॅमेज असे म्हणतात. यात यकृत, मुत्रपिंड, फुप्फुस, हृदय काम करतात. १०० टक्के ब्रेन डेड झाल्याचे कळल्यानंतर गुप्ता कुटुंबियांनी अवयव दानाचा अभिनंदनीय निर्णय घेतला. झोनल ट्रान्स प्लांट ऑर्गनायझेशन कमिटीच्या (झेडटीसीसी) माध्यमातून आधी नागपुरातील दोन रुग्णांसाठी मुत्रपिंड मागवले होते. मात्र नंतर त्यांनी नकार दिला. कोणाला अवयव द्यायचे याचा निर्णय झेडटीसीसीनेच घेतला. त्यानुसार काम केले. या प्रक्रियेचा खर्च रुग्णालयाने केला. तीन दिवस २४ तास रुग्णालयातील डॉक्टर सहायक झोपता काम करीत होते. इको, अॅनेस्थेशिया,कोल्ड स्टोरेजचे पैसे घेतले नाहीत. यकृत मुत्र पिंड मुंबईत पाठवली. हृदय मात्र वेळ झाल्यामुळे देता आले नाही, अशी माहिती पत्रपरिषदेत डाॅ. चौधरी यांनी दिली. यावेळी मुख्य शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम आणि गुप्ता कुटुंबीय उपस्थित होते. यात डाॅ. पाटणकर, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, पोलिस विभाग जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य केल्याचेही डाॅ. चौधरी यांनी सांगितले. 
 
ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढण्यास लागतात तीन तास : ब्रेनडेड झालेल्या व्यक्तिच्या शरीरातून सुस्थितीत असलेले अवयव काढण्यास अडीच ते तीन तास लागतात. मुत्रपिंड 4 ते 6 तासात, हृदय यकृत 4 तासात गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करावे लागते. तेव्हाच ते व्यवस्थित काम करते. ही शस्त्रक्रिया फारच जोखमीची असते. यात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे वेळेचे नियोजन करून काम करावे लागते. अन्यथा परिश्रम वाया जातात. याच कारणास्तव हृदय काढले नाही. अन्यथा चेन्नईतील फोर्टीस हाॅस्पीटलच्या डाॅ. मुरली यांनी हृदय मागितले होते. मुत्रपिंडासाठीच रक्तगट आवश्यक असतो. मनोज यांचा रक्तगट पॉझिटीव्ह असल्याने मुंबईत मुत्रपिंडाचे विकार असलेले या रक्त गटाचे गरजू रुग्ण मिळाले. यकृतासाठी रक्त गटाची आवश्यकता नसते. ते दोन रुग्णांना जीवनदान देते, अशी माहिती चौधरी हाॅस्पीटलद्वारे देण्यात आली. 
 
ग्रीनकाॅरिडोरमधून २३ मिनिटांत बेलोऱ्यात पोहोचले अवयव : ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातून अवयव काढल्यानंतर ते वेगाने हवाई रुग्णवाहिकेत पोहोचवावे लागते. यासाठी वाहतूक पोलिसांनी खापर्डे बगिचा येथील चौधरी हाॅस्पीटल ते बेलोरा विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार केले. इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, बियाणी चौक, तेथून वेलकम पाँईट नंतर सुपर हायवेद्वारे बेलोरा विमानतळ असा हा मार्ग विशेष कार्डिक रुग्णवाहिकेसाठी मोकळा ठेवला होता. चौधरी हाॅस्पीटलमधून सायं. ४. २९ वाजता निघालेली विशेष रुग्णवाहिका ४.५२ वाजता विमानतळावर पोहोचली. २१ कि.मी. अंतर २३ मिनिटांत कार्डिक रुग्णवाहिकेने पूर्ण केले. सात मिनिटांत विमानात अवयव ठेऊन सायं. वाजता विमानाने उड्डाण केले. पायलट गाडीतील पोलीस उपनिरीक्षक अश्विन महाजन, हे.काॅ. अंबिका प्रसाद यादव, राजेश नितनवरे, चालक याेगेश गिरासे यांनी मार्ग मोकळा करण्याची कामगिरी केली. 

अमरावती विभागातील दुसरी घटना : ११ मार्च २०१७ रोजी ब्रेनडेड झालेला जेवड नगरातील अनुप गायकवाडचे अवयव त्याच्या कुटुंबियांनी दान केल्यामुळे तिघांचे प्राण वाचले होते. त्यावेळी केवळ १७ मिनिटांत पोहोचले विमानात यकृत पोहोचले होते. त्यानंतर ब्रेनडेड मनोज गुप्ता यांचे अवयव कुटुंबियांनी दान करण्याची विभागातील ही दुसरी वेळ होय. याआधी मुलीचे अवयव दान करण्याचाही निर्णय तिच्या कुटुंबियांनी २००७ मध्ये घेतला होता. परंतु, त्यावेळी अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित सोयी नव्हत्या. त्यामुळे या मुलीला औरंगाबाद येथे नेण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला होता. परंतु, तेथे पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे अवयव दान होऊ शकले नाही, अशी माहितीही डाॅ. चौधरी यांनी दिली.  
 
दान केलेले अवयव रुग्णवाहिकेमधून नेताना बघून कुटुंबीयही गहिवरले 
ज्यावेळी मनोज गुप्ता यांचे यकृत, मुत्रपिंड काढून मुंबईला पाठवण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले त्यावेळी डाॅ. अविनाश चौधरींना वडील माणिकलाल गुप्ता, आई निर्मला, पत्नी जागृती, मुलगा कुणाल, मुली वैष्णवी आणि खुशबू यांना बोलावले ज्या पेटीतून अवयव नेले जात होते ती दाखवली. याद्वारे मनोज गुप्ता जिवंत आहेत, असे सांगितल्यानंतर गुप्ता कुटुंबियांना गहिवरून आले. मात्र स्वत:ला आवरत त्यांनी डाॅक्टरांचे आभार मानले. त्यासोबतच मोठे मन करून अवयव दानाचा निर्णय केल्याबद्दल मुंबई येथील डाॅक्टरांसह डाॅ. चौधरी, मुख्य शल्य चिकित्सक डाॅ. श्यामसुंदर निकम यांनी गुप्ता कुटुंबियांचे अभिनंदन केले. सोबतच त्यांच्यासाठी हा सर्वात भावूक क्षण होता कारण त्यांनी आठ दिवस दु:ख भोगल्यानंतरही अवयव दानाचा निर्णय घेतला असे मत व्यक्त केले. 

दान केलेले अवयव रुग्णवाहिकेमधून नेताना बघून कुटुंबीयही गहिवरले 
ज्यावेळी मनोज गुप्ता यांचे यकृत, मुत्रपिंड काढून मुंबईला पाठवण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले त्यावेळी डाॅ. अविनाश चौधरींना वडील माणिकलाल गुप्ता, आई निर्मला, पत्नी जागृती, मुलगा कुणाल, मुली वैष्णवी आणि खुशबू यांना बोलावले ज्या पेटीतून अवयव नेले जात होते ती दाखवली. याद्वारे मनोज गुप्ता जिवंत आहेत, असे सांगितल्यानंतर गुप्ता कुटुंबियांना गहिवरून आले. मात्र स्वत:ला आवरत त्यांनी डाॅक्टरांचे आभार मानले. त्यासोबतच मोठे मन करून अवयव दानाचा निर्णय केल्याबद्दल मुंबई येथील डाॅक्टरांसह डाॅ. चौधरी, मुख्य शल्य चिकित्सक डाॅ. श्यामसुंदर निकम यांनी गुप्ता कुटुंबियांचे अभिनंदन केले. सोबतच त्यांच्यासाठी हा सर्वात भावूक क्षण होता कारण त्यांनी आठ दिवस दु:ख भोगल्यानंतरही अवयव दानाचा निर्णय घेतला असे मत व्यक्त केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...