आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक वारसा संपवून शहरांचा विकास होऊ शकत नाही- पंडित राजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बनारसी घराण्याची गायन परंपरा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ गायकद्वय पंडित राजन व साजन मिश्र हे बंधू ब्रह्मनाद कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात येऊन गेले. त्यानिमित्त राजन यांच्याशी झालेल्या गप्पांतून त्यांनी अंतरंग उलगडले.
सध्या केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना सुरू आहे. पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेले काशीही स्मार्ट होणार आहे...
काशी कधीही स्मार्ट शहर होऊ शकणार नाही. कारण काशीची मुळात तेवढी क्षमताच नाही. कोणताही विकास मूळ संस्कृतीला संपवून होऊ शकत नाही. मोठमोठ्या इमारती, उड्डाणपूल, मोनो वा मेट्रो रेल्वेचे जाळे उभारून आणि तेथील संस्कृतीचा बळी देऊन कोणत्याही शहराचा विकास कदापि होऊ शकत नाही. काशी हे खूप घनदाट लोकवस्तीचे शहर आहे. त्याची विस्ताराची क्षमता नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

निश्चलीकरणाचा कार्यक्रमांवर काही परिणाम झाला आहे काय?
निश्चितच झाला आहे. यामुळे कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला लहान-मोठे प्रायोजक लागतात. पण त्यांच्याकडे पैसाच नसल्यामुळे आता एकदम कोणी पुढे यायला धजावत नाही.

आजकाल फ्यूजनचे कार्यक्रम खूप होतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
फ्यूजन आताच होत आहे असे नाही. पूर्वीही फ्यूजन होतच होते. पण पूर्वी फ्यूजन करताना त्यात संशोधन करीत. विदेशी वाद्यमेळ वा गाणे असले तरी त्यात स्वत:चे काही घालून भारतीय स्वरूपात फ्यूजन होत असे. त्यामुळे जुन्या गाण्यातील गोडवा आजही कानाला सुखावतो.

नुकताच मुंबईत ‘कोल्ड प्ले’ राॅक बँडचा कार्यक्रम झाला. यासाठी कोलकाता, हैदराबाद या शहरांतून मोठ्या संख्येने तरुण मुले-मुली आल्या होत्या. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तरुणांची गर्दी दिसत नाही. असे का होत असावे?
याला कारण आपले शिक्षण आणि संस्कृतीवर असलेला प्रभाव आहे. समाजात इंग्रजीला आणि इंग्रजी बोलणाऱ्यांना अधिक प्रतिष्ठा आहे. हे आमचे दुर्भाग्य आहे. त्यामुळे आपल्या शास्त्रीय संगीताला अॅप्रिसिएशन मिळत नाही.

आज आॅनलाइन वा यूट्यूबवरून संगीत शिकवले जाते. अभिजात भारतीय संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. अशात त्यातून खरेच काही शिकता येते का?
बदलत्या परिस्थितीत संगीत शिकण्याची माध्यमेही बदलत आहेत. वर्तमानात हे आवश्यकही आहे. त्यामुळे संगीताचा परिघ विस्तारतो. पूर्वीसारखे गुरुकुल पद्धतीने आता शिकवतो म्हटले तरी ते शक्य नाही. पण आॅनलाइन शिकून कोणी भीमसेन जोशी, अब्दुल करीमखाँ कदापि होऊ शकत नाही हे लक्षात घेणेही गरजेचे आहे.

घराण्याचा अहंकार बाजूला ठेवून, विविध घराण्यांची वैशिष्ट्ये आत्मसात करून एक अभिनव गायकी रसिकांसमोर मांडणारे गायक आहेत. याबद्दल काय वाटते?
आम्ही बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करतो. पण अन्य सर्व घराण्यांविषयी आम्हाला प्रेम, आत्मीयताच आहे. जिथे चांगले काही ऐकायला मिळते ते आपल्या गायकीला, गळ्याला मानवेल असे वाटले तर ते आम्ही जरूर घेतो. नव्या काळात घराण्यांच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत हे खरेच आहे. जे आवडेल ते जरूर घ्यायला हवे, फक्त घेताना तारतम्य असावे इतकेच...
बातम्या आणखी आहेत...