आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. तर गावाची जबाबदारी पालकमंत्र्यांवर : पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आमदारांनी गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक आमदारांनी अद्यापही गावे दत्तक घेतल्याने हीच परिस्थिती कायम राहिल्यास गावे निवडण्याची जबाबदारी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे सोपवली जाईल,’ अशी माहिती महिला बालकल्याण आणि ग्राम विकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नागपुरात बोलताना रविवारी दिली.

तूर्तास दत्तक गावांच्या विकासासाठी वेगळा निधी दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याने आमदारांसाठी ही योजना सुरू केली आहे. मात्र, आमदारच त्याकडे पाठ फिरवत असतील तर पालकमंत्र्यांनी गावे निवडण्याचा िनर्णय घ्यावा. दत्तक गावाच्या विकासासाठी वेगळा निधी दिला जात नसल्याने आमदारांना त्यात रस वाटत नाही, याकडे लक्ष वेधले असता तूर्तास वेगळ्या निधीची गरज वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. वेगळा निधी देण्याची गरज आहे काय, हे तपासून अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्या म्हणाल्या.

परिचालकांबाबत आठवडाभरात निर्णय
संगणक परिचालकांच्या मागण्यांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, १५ जानेवारीपर्यंत निर्णयाचे आश्वासन होते. मात्र, त्यात थोडा उशीर होत आहे. येत्या आठवडाभरात योग्य तो निर्णय होईल, असे त्या म्हणाल्या.