आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील दोन उड्डाणपुलांखालील तुटपुंज्या जागेत ‘पे अँड पार्किंग’, सुरू असते ‘तूतू-मैमै’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील भर बाजारामधील पार्किंगची गंभीर समस्या कायम ठेवून महापालिकेने केवळ उड्डाणपुलाखालील तुटपुंज्या जागेत ‘पे अँड पार्किंग’ची सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय गुरुवारच्या (२३ जून) आमसभेत घेतला आहे. शहरातील अन्य ठिकाणच्या पार्किंगचा प्रश्न तसाच कायम असल्याने वाहनधारकांना मात्र इतर ठिकाणी वाहने उभी करताना मात्र ‘तूतू-मैमै’ करावी लागणार आहे.

राजकमल चौक तसेच पंचवटी चौकातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली वाहन ठेवण्यासाठी नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार आहे. राजापेठ पोलिस स्टेशन ते इर्विन तसेच विभागीय क्रीडा संकुल ते संत गाडगेबाबा समाधी मंदिरापर्यंत असलेल्या उड्डाणपुलाखाली वाहन लावण्यासाठी पैसे घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मार्च महिन्यात ठेवण्यात आला होता. नगरसेवकांचा विरोध असल्याने मागील तीन सभेत यावर केवळ चर्चा करण्यात आली.

नागरिकांकडून तक्रारी आक्षेप नाेंदवण्यात आल्याशिवाय या प्रस्तावाला मान्यता देण्यात येऊ नये, असे नगरसेवकांचे एकमत मागील सभेत झाले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्रशासनाकडून मागवण्यात आले नसल्याची बाब समोर आली. दिनेश बुब यांनी याचा आधार घेत तक्रारी आक्षेप नोंदवल्यानंतर धोरण निश्चित करण्याची मागणी केली. शिवाय विरोधी पक्ष नेता प्रवीण हरमकर, शेख हमीद शद्दा, अमोल ठाकरे यांनीदेखील या धोरणाला विरोध दर्शवला. मार्केटमधील मूठभर व्यावसायिकांनी पुलाखाली कायमस्वरूपी शोधलेल्या पार्किंगसाठीच्या जागा सोडवण्यासाठी शहरात येणाऱ्या शहरातील हजारो नागरिकांना त्याचा भुर्दंड का, असा सवालही या नगरसेवकांनी उपस्थित केला. मात्र, ‘पे अँड पार्किंग’मुळे महापालिकेच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, शिवाय व्यापाऱ्यांनी गिळंकृत केलेली जागा मोकळी होईल, असे प्रकाश बनसोड, वसंतराव साऊरकर, प्रा. प्रदीप दंदे, भूषण बनसोड, अजय गोंडाणे, प्रा. सुजाता झाडे, बाळासाहेब भुयार यांचे म्हणणे आहे. सभागृहाचे एकमत होत नसल्याने महापौर चरणजित कौर नंदा यांनी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेच्या या निर्णयामुळे उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून त्याखाली वाहनांची विनामूल्य पार्किंग सुविधा आता संपुष्टात येणार आहे. या वेळी आयुक्त हेमंत पवार, नगरसचिव मदन तांबेकर, सर्व गटनेते नगरसेवक उपस्थित होते.

तुमची‘दुकानदारी’ तुम्ही पाहा :
‘पेअँड पार्किंग’ला विरोध करताना नगरसेवक दिनेश बुब चांगलेच आक्रमक झाले. आमची दुकानदारी व्यवस्थित सुरू आहे. नागरिकांवर भुर्दंड टाकणारा प्रस्ताव मंजूर कराल तर तुमची ‘दुकानदारी’ तुम्हीच पाहून घ्या, असा टोला बुब यांनी लगावला.

तखतमलमार्केट गाजले :
शहराच्यामध्यभागी असलेल्या सर्वात मोठ्या तखतमल मार्केटचा विषय सभेत चांगलाच गाजला. नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे यांच्याकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मार्केटमधील अनेक अनियमिततेवर त्यांनी बोट ठेवले. प्रशाधनगृह, पार्किंग, बांधकामाचा प्रकार, रॅम्प तसेच इमारतीच्या आयुष्याबाबत त्यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आले.

माजीमंत्र्याच्या कुटुंबाचा अनुभव :
काँग्रेसचेज्येष्ठ नेते वसंतराव साऊरकर यांनी मराठवाड्यातील काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या कुटंुबाला आलेला अनुभव सभेत विशद केला. माजी मंत्र्याच्या वाहनचालकाला पार्किंगकरिता उड्डाणपुलाला माराव्या लागलेल्या फेऱ्याचा अनुभव साऊरकर यांनी सभागृहाला करून दिला.
पुढे काय?
उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्किंग’ प्रकल्प सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. याकरिता कंत्राटदाराची नेमणूक महापालिकेकडून केली जाईल. सहा महिन्यांच्या प्रयोगानंतर नियमित कंत्राट दिले जाणार आहे.
प्रायोगिक प्रकल्प

नागरिकांवर नाहक भुर्दंड
‘पेअँडपार्किंग’मुळे सामान्य नागरिकांवर भुर्दंड पडणार आहे. शहरात येणाऱ्या किमान १० हजार नागरिकांना या धोरणाचा फटका बसणार आहे. या प्रस्तावाचा विरोध कायम राहणार आहे. महापालिकेने जनतेवर भुर्दंड लादू नये. प्रवीणहरमकर, विरोधी पक्षनेता.

सहा महिन्यांसाठी प्रयोग
शहरातीलअन्य‘पे अँड पार्किंग’चा अभ्यास करून उड्डाणपुलाखाली हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. सर्व साधारण सभेत या धोरणास मंजुरी देण्यात आली. सभागृहाचे एकमत होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. चरणजितकौर नंदा, महापौर
बातम्या आणखी आहेत...