आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या जागा हडपणाऱ्या ७३ व्यापारी संकुलांना नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील पार्किंगचे भीषण वास्तव या गंभीर समस्येला कारणीभूत ठरणारे विविध कंगोरे दै.दिव्य मराठीने उघड केल्यानंतर पार्किंगची जागा हडपणाऱ्या तब्बल ७३ व्यापारी संकुलांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. प्राथमिक तपासणी केलेल्या ८० पैकी ७३ व्यापारी संकुल धारकांना बांधकाम परवानगी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. बांधकामावर कारवाई करीत पार्किंगची जागा नागरिकांसाठी खुली करण्याचे आदेश मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी मंगळवारी (१२ जुलै) दिले आहेत.
शहरातील पार्किंगचे भीषण वास्तव दिव्य मराठीने उघड केल्यानंतर गृहखात्याने त्याची गंभीर दखल घेतली. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शहरातील पार्किंगबाबत कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याअनुषंगाने कारवाई करीत महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुल, हॉस्पीटल, मंगल कार्यालयातील पार्किंगच्या व्यवस्थेची माहिती आयुक्त पवार यांनी जाणून घेतली. सर्व सहाय्यक आयुक्त, झोन कार्यालय, सहाय्यक संचालक नगर रचना संबंधित अभियंतांची तातडीने बैठक घेत पार्किंग व्यवस्थेबाबत कठोर कारवाई करण्याचे दिशा-निर्देश देण्यात आले. शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करता यावी म्हणून सर्व झोन अंतर्गत कारवाई करण्यासाठी झोन निहाय चमू गठित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पार्किंगबाबत संयुक्तपणे ८० व्यापारी संकुल अन्य वाणिज्यिक बांधकामांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणी करण्यात आलेल्या ८० पैकी ७३ इमारत धारकास बांधकाम परवानगीबाबत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी यापुढे देखील कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश अायुक्तांकडून देण्यात आले. कागदपत्रांची तपासणी करीत पार्किंगमध्ये आढळून आलेल्या बांधकामावर तातडीने कारवाई करीत जागा नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

झोननिहाय चमू : शहरातीलपार्किंग व्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टिने झोननिहाय चमू गठित केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाच झोन अंतर्गत ही चमू पार्किंग व्यवस्थेचा नियमित आढावा घेणार आहे. शिवाय नागरिकांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे कार्य करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...