आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पतंजली’ला विराेध: मिहानमधील रामदेवबाबांचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरातील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेबाबा यांच्या पतंजली समूहाच्या फूडपार्कसाठी जमीन देण्याचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या व्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी शुक्रवारी केली.

‘रामदेवबाबा हे आता योगगुरू राहिलेले नसून ते उद्योगपती झाले आहेत. त्यांचा पतंजली उद्योग ते १० हजार कोटींवर पोहोचला आहे. या समूहाला २५ लाख रुपये एकर दराने मिहानमध्ये जमीन देण्यात आली. ही जमीन निविदांच्या माध्यमातून दिली असली तरी निविदांमध्ये अन्य कुणीही सहभागी होणार नाही, अशा पद्धतीने प्रयत्न झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रामदेवबाबा यांनी भाजपसाठी प्रचार केला. त्याची परतफेड या पद्धतीने करण्यात येत अाहे,’ असा अाराेपही मुत्तेमवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघेही सरकारी जमीन म्हणजे आपली वडिलोपार्जित मालमत्ता असल्यागत वागत आहेत. नागपूरसह काटोल, गडचिरोली अमरावती या चार ठिकाणी सुमारे हजार एकर जमीन स्वस्त दरात पतंजली उद्याेग समूहाला देण्याची सरकारची योजना आहे. रामदेवबाबा शेतकऱ्यांची दैना संपविणार असल्याचा प्रचार सरकारकडून केला जात असून गडकरी हे तर पतंजली समूहाचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्यासारखे काम करत आहेत. या जागांवर नेमके कोणते उद्योग येणार, त्यात किती रोजगार उपलब्ध होणार याचाही खुलासा करण्याची गरज आहे, अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली.
२३० एकरवरील अाज फूडपार्कचे भूमिपूजन
नागपूरच्या मिहान प्रकल्पात फूडपार्क उभारण्यासाठी पतंजली उद्याेग समूहाला सरकारकडून २३० एकरचा भूखंड मिळाला अाहे. त्यासाठी पतंजलीने ५८.६३ काेटी रुपये एमअायडीसीच्या कार्यालयात भरले अाहेत. अाता शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा भूमिपूजन साेहळा हाेत अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील फळांना चांगला भाव मिळेल, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अात्महत्यांचे प्रमाण कमी हाेईल. तसेच या प्रकल्पात विदर्भात दाेन हजार राेजगार निर्मिती हाेईल, असा दावाही केला जात अाहे.
जळगाव दूध संघाचे लाेणी पतंजली घेणार
जळगाव- जिल्हासहकारी दूध उत्पादक संघाकडून (विकास) पतंजली उद्याेग समूह लाेणी खरेदी करणार अाहे. पतंजलीसाठी अावश्यक असलेले गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण करण्यात अाले अाहेत. या दूध संघाने गेल्या ४५ वर्षांत प्रथमच ३६५ काेटी रुपयांच्या अार्थिक उलाढालीचा उच्चांक नाेंदवला असल्याची माहिती माजी दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. राज्य शासनाच्या ५० काेटींच्या अार्थिक मदतीतील २४.५ काेटी रुपयांचा पहिला हप्तादेखील दूध संघाला मिळाल्याची माहिती खडसे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...