आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाभाव, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वि‍सावा कक्ष, जेवणही मोफत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) शहरासह जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेरील महिला रुग्ण रात्री-बेरात्री मोठ्या प्रमाणात दाखल होतात. यावेळी त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईकसुद्धा असतात. मात्र, महिलांचे रुग्णालय असल्यामुळे पुरुष नातेवाईकांना रात्रीच्यावेळी रुग्णालयाबाहेर थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागते. रुग्णांच्या नातेवाईकांची हाेणारी ही गैरसोय पाहून याच रुग्णालयात काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन परिसरात माेफत आरामदायी विसावा कक्ष सुरू केले आहे. एवढेच नाही तर रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना एकवेळीचे भोजनसुद्धा मोफत दिले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या या सेवाभावी विनामूल्य भोजनाचा दरदिवशी अडंीचशे ते तीनशे रुग्ण नातेवाईक लाभ घेत आहेत. तर किमान ५० ते ६० जण विसावा कक्षात रात्रीच्यावेळी निवास करत आहेत.
डफरीन रुग्णालयाच्या परिसरात मागील अनेक वर्षांपासून धर्मशाळा बांधून ठेवण्यात आली आहे. मात्र ही धर्मशाळा उपयोगात नव्हती. दुसरीकडे रुग्णांचे नातेवाईक कशा पद्धतीने दिवस काढत आहेत, ही बाब या ठिकाणी काम करणारे कर्मचारी पाहत होते, आपण यांच्यासाठी काही तरी करून त्यांची व्यवस्था करावी, असे या कर्मचाऱ्यांनी ठरवले. मात्र सदर धर्मशाळा वापरात घेण्यासाठी एखादी सेवाभावी संस्था पाहीजे, ही कायदेशीर अडचण कर्मचाऱ्यांपुढे आली. त्यामुळे याच कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन श्री संत गजानन महाराज सेवाभावी बहुद्देशीय संस्था स्थापन केली. कर्मचाऱ्यांच्या या पुढाकाराला दाद देत डफरीन प्रशासनाने धर्मशाळा यांच्या सेवाभावी संस्थेला दिली. संस्थेने धर्मशाळेची स्वच्छता केली आणि या ठिकाणी असलेले दोन हॉल रुग्णांच्या नातेवाईकांना रात्रीच्या निवासासाठी खुले करून दिले. निवासासोबतच रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन मिळावे म्हणून दरदिवशी सायंकाळी एकवेळीचे मोफत भोजन देण्याची व्यवस्था केली. तुर्तास याच धर्मशाळेत रुग्णाच्या नातेवाईकांना दरदिवशी सायंकाळी ते ७.३० यावेळात मसाला भाताचे मोफत वितरण करण्यात येते. या दोन्ही सुविधा या सेवाभावी संस्थेकडून डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी स्वत:च एकत्र येऊन सुरूवातीला आर्थिक तरतूद केली. मात्र दुसऱ्याच दिवसांपासून काही दानदात्यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून योगदान देण्यास सुरूवात केली आहे. श्री संत गजानन बाबा सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम अविरत सुरू ठेवण्यात येणार अाहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ईसळ तर सचिव राजू सानप आहेत. संस्थेचे पदाधिकारी सुनील मार्डीकर, विनोद हगवने, शिवदास गायगोले, महेश गवळे, इरफान काजी, विजय ठाकरे, दीपक सांबे हे आहेत. हे सर्व पदाधिकारी स्वत: राबून रुग्ण नातेवाईकांना ही मोफत सेवा पुरवत आहेत. शासकीय रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य वागणूक देत नाही, अशी अनेकदा ओरड होते. मात्र या उपक्रमामुळे आरोग्य कर्मचारी सुश्रूशेसोबतच हे कामसुद्धा करतात, हे श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्थेच्या कार्यातून दाखवून दिले आहे.

अविरत सुरू ठेवणार सेवा
- मागील अनेकदिवसांपासून आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय पाहून हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अविरत सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवासाच्या ठिकाणी आम्ही एक चौकीदार नेमला आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच सीसीटीव्हीसुध्दा लावणार आहे. राजूसानप, सचिव, श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्था,अम.

परिस्थिती पाहून घेतला निर्णय
आम्ही मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहे. रुग्णांच्या पुरूष नातेवाईकांना ऊन, वारा, थंडी, पावसात बाहेर कुडकुडताना पाहले. त्यामुळे आपण काही तरी करावे, हे ठरवून आम्ही हे सेवाभावी काम सुरू केले आणि अविरत चालवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राजू सानप, सुनील मार्डीकर, विनोद हगवणे आदींनी व्यक्त केला आहे.

आम्ही सुरूवात केली आहे, या उपक्रमाला आम्हाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल वारे यांचेही सहकार्य लाभले आहे. भविष्यात आम्ही याच ठिकाणी महीला रुग्णांना लागणाऱ्या काळ्या चहाची व्यवस्था करणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. सोबतच ३६५ दिवस हा उपक्रम सुरू राहावा म्हणून आम्ही या उपक्रमात आम्हाला सहकार्य करणारे ३६५ सदस्य गोळा करत अाहोत. त्यांच्या मदतीने आमहा दरदिवशी अन्नदान करता येईल सद्या आमचे ५० सदस्य झाले आहेत असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णांसाठी गरम पाणी मोफत
बाळंतीण रुग्णांना गरम पाण्याची गरज राहते. डफरीनमध्ये दाखल असलेल्या रुग्णाचे नातेवाईक दरदिवशी रुग्णांसाठी बाहेरून पैसे खर्च करून शेकडाे लीटर गरम पाणी आणायचे, मात्र कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून गिझर मशीन बसूवन गरम पाणी मोफत उपलब्ध केले आहे.
बातम्या आणखी आहेत...