आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसच्या सुरक्षेत अनास्था, नागपुरातील 126 शाळांना दंड; फिटनेसकडे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- स्कूल बसची सेवा पुरवणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करत असलेल्या अनास्थेची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली. अशा १२६ शाळांना उच्च न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  या शाळांना तीन आठवड्यांत दंड भरावा लागणार आहे.

२०१३ मध्ये नागपुरात स्कूलबसच्या चाकाखाली येऊन एका मुलाचा मृत्यू झाला हाेता. या घटनेची न्यायालयाने स्वतः दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली होती. विद्यार्थ्यांची स्कूलबसच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखभाल, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आणि शाळेच्या स्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला दिले होते. तथापि, काही निवडक शाळा वगळता बहुतांशी शाळांनी स्कूल बससंदर्भात समित्याच स्थापन केल्या नाहीत. न्यायालयाने त्यानंतर राज्यभर अशा समित्या स्थापन करण्याची सूचना केली होती. शिक्षण विभागानेही मुलांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन शाळांना बसमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था, गरज भासल्यास महिला वाहकाच्या नेमणुकीसह बऱ्याच सूचना केल्या होत्या. मात्र, बहुतांशी शाळांनी त्याकडे चक्क दुर्लक्ष केले. नागपूर जिल्ह्यातील १३८ शाळांना यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्यावर केवळ १२ शाळांनी न्यायालयाच्या निर्देशांची दखल घेऊन प्रतिज्ञापत्रे दाखल केली होती. उर्वरित शाळांनी न्यायालयाच्या निर्देशांची साधी दखलही न घेतल्याने बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या १२६ शाळांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला.
 
 फिटनेसकडे दुर्लक्ष
राज्यात सध्या २५ हजार ३६९ स्कूल बसची नोंदणी आहे. त्यांची फिटनेस चाचणी घेण्याचे निर्देश शाळा आणि आरटीओ कार्यालयाला उन्हाळ्यात देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १३,४०० स्कूल बसची फिटनेस चाचणी झाली असून उर्वरित शाळांनी परिवहन विभागाच्या आदेशाची दखलही घेतली नाही. अशा शाळांच्या बसगाड्यांवर परिवहन विभागाने नेमकी काय कारवाई केली, याची माहिती देणारे शपथपत्रही आरटीओला  सादर करावे लागणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...