आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाजीराव मस्तानी’ आमदारांना दाखवा, नंतरच प्रदर्शित करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे तसेच मराठ्यांच्या इतिहास व संस्कृतीचा विचार न करता चित्रीकरण करण्यात आले आहे. तेव्हा हा चित्रपट आधी अामदारांना दाखवण्यात यावा, त्यानंतरच प्रदर्शनाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

या चित्रपटात काशीबाई व मस्तानीवर चित्रित करण्यात आलेले ‘पिंगा’ तसेच बाजीराव पेशव्यांचे ‘शेंडी’ हातात घेऊन ‘मल्हारी’ या गाण्यावर विकृत नाचणे हे एक मराठी लोकप्रतिनिधी म्हणून पटत नाही, अशा भावना सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत. पेशव्यांचे वारस तसेच सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतलेला असतानाही त्यांच्या आक्षेपांना न्याय मिळालेला नाही. वारसदार अथवा इतिहास तज्ज्ञांकडून योग्य निर्देश येत नाहीत, तसेच चित्रपटातील वेदनादायी प्रसंग कापले जात नाहीत, तोपर्यंत ताे प्रदर्शित करण्यात येऊ नये, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
हा तर बाजीरावांचा अपमान : कुलकर्णी
बाजीराव पेशव्यांना मल्हारी गाण्यावर नृत्य करताना दाखवण्यात आले आहे. हा श्रीमंत पेशवे व मराठी अस्मितेचा अपमान अाहे, अशा भावना आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत. बाजीराव पेशव्यांना उणेपुरे ४१ वर्षांचे आयुष्य लाभले. एवढ्या अल्प वयात त्यांनी २१ लढाया लढल्या व त्या सर्व जिंकल्या. ते झोपही घोड्यावरच घेत असे सांगतात. अशा अजेय योद्ध्याला नाचताना दाखवणे हा अपमान आहे. काशीबाई आणि मस्तानीचे एकत्र नृत्य तर अशक्यच आहे. तेव्हा चित्रपटाचा तपशील तपासून पाहावा आणि दोन्ही गाणी वगळण्यात यावीत, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.