आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढे कुणालाही अंगठाछाप म्हणता येणार नाही; पंतप्रधानांकडून ‘भीम-आधार पे-ॲप’चे लाँचिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- एकेकाळी अंगठा हे निरक्षरतेचे चिन्ह होते. निरक्षर माणसाला अनपढ आणि अंगठाछाप म्हटले जायचे; त्याच अंगठ्याला आम्ही शक्तिकेंद्र केले आहे. त्यामुळे यापुढे अडाणी माणसालाही अंगठाछाप म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.

नागपुरातील मानकापूर येथील क्रीडा संकुलात आयोजित डिजिधन मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते भीम-आधार पे-ॲपचे लाँचिंग, दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे लोकार्पण यासह अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर नंदा जिचकार आदींची उपस्थिती होती.

भीम अॅपचे पेटंट घेऊन ठेवावे...
‘भीम-आधार पे ॲप’ ही बायोमेट्रिक आधारित देयक प्रणाली असून यामुळे अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने पैसे भरणे शक्य आहे. भीम-आधारच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाला स्मार्ट फोन, इंटरनेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर न करता डिजिटल व्यवहार करता येतील. 

ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अशा लोकांसाठी यामुळे डिजिटल पद्धतीने पैसे भरणे सुलभ होणार अाहे. भारताच्या या क्रांतिकारी योजनेची जगभरात दखल घेतली जाईल. जगभरातील विद्यापीठांत याचा अभ्यास होईल. रविशंकर प्रसाद यांनी याचे पेटंट घेऊन ठेवावे, असे मोदी म्हणाले. 

अनेक योजनांचा शुभारंभ...
पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंफर्न्मेशन टेक्नाॅलाॅजी, आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट या संस्थांचे भूमिपूजन, पंतप्रधान घरकुल योजनेतंर्गत राज्यातील २१ शहरात ४२ हजार घरे बांधण्याची योजना तसेच दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे अनावरण झाले.

भीम अॅपच्या माध्यमातून युवकांसाठी शिकवा-कमवा...
तरुणाईचे अंगठे मोबाइलवर बिझी असतात. त्याचा सकारात्मक उपयोग त्यांनी इतरांना ‘भीम पे अॅप’ डाऊनलोड करून द्यावे. त्यांना शिक्षित करावे. त्या व्यक्तीने तीन व्यवहार केले की संबंधित युवकाच्या खात्यात १० रुपये जमा होतील. १४ एप्रिल ते १४ आॅक्टोबर या कालावधीत ही योजना राहील.

५० लाखांचे बक्षीस त्यांनी दिले गंगा शुद्धीकरणासाठी
डिजिधन व्यापार योजने अंतंर्गत ५० लाखांचे पहिले बक्षीस चेन्नईतील जीआरटी ज्वेलर्सचे आनंद पद्मनाभन यांना मिळाले. त्यांनी आयसीआयसीआय कार्डने ग्राहकाचे ३०० रु. स्वीकारले होते. त्यांनी ५० लाखांचा धनादेश गंगा निधीसाठी मोदींकडे दिला. बँकेनेही त्यात ५० लाख देत असल्याचे जाहीर केले.

लकी ग्राहक : लातूरच्या श्रद्धाला १ कोटींचे बक्षीस
आॅनलाइन खरेदीचा माेबाइलचा १५९० रुपयांचा कर्जाचा हप्ता रुपे कार्डमार्फत भरणारी लातूरची श्रद्धा मोहन मेंगशेट्टे ही डिजिधन मेळाव्यातील लकी ग्राहक योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांच्या पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली. नागपूर येथे आयोजित डिजिधन मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिने बक्षीस स्वीकारले. मोदी तेथून गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी तिला अक्षरश: गराडा घातला.श्रद्धा ही लातूरची राहणारी असून सध्या ती पुण्याला इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. वडिलांचे किराणा दुकान आहे. वडिलांकडे मोबाइल विकत घेण्यासाठी पैसे मागू शकत नव्हती म्हणून गावातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतले. त्याचा १५९० रुपयांचा हप्ता तिने रुपे कार्डमार्फत आॅनलाइन भरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘या पैशाचे तू काय करणार?’
पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणे खूप भाग्याचे आहे. मला माझ्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत, असे श्रद्धा म्हणाली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी, ‘या पैशाचे काय करणार?’ असे विचारले. ‘अजून काही ठरवले नाही’, असे त्यांना सांगितले.

द्वितीय बक्षीस प्रजापती यांना...
लकी ग्राहक योजनेत हार्दिक प्रजापती यांना ५० लाखांचे द्वितीय तर भारत सिंग यांना २५ लाखांचे तृतीय बक्षीस मिळाले. तर डिजिधन व्यापार योजनेतंर्गत ठाणे येथे ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या रागिणी राजेंद्र उट्टेकर यांना २५ लाखांचे द्वितीय व हैदराबाद येथील शेख रफी यांना १२ लाखांचे तिसरे बक्षिस मिळाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍याचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...