आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांच्या गस्तीने शहरात वचक; वेलकम पॉईन्ट, पंचवटी शहरातील चौकात शिस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
file photo - Divya Marathi
file photo
अमरावती - जवळपास महिनाभरापासून पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रात्रीच्या वेळी गुन्हे शाखा, क्युआरटी पथकासह गस्त घालतात. यावेळी शहरातील मार्गांवर विनाकारण दुचाकी उभी करून गप्पा मारणारे, सुसाट वाहन हाकणारे, रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू आहे. पोलिस आयुक्तांच्या या कारवाईमुळे सद्या शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
 
शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्तांचा ताफा पंचवटी चौक मार्गे वेलकम पॉईन्टवर पोहचला होता. वेलकम पॉईन्टवर खासगी बसेसचा थांबा आहे. त्यामुळे सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी प्रवाश्यांची गर्दी राहते. प्रवाश्यांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी काहींनी दुकान थाटले होते. रस्त्याच्या कडेला दुकान असल्यामुळे प्रवाशांना उभे राहणे कठीण झाले होते तसेच येणाऱ्या खासगी बसेस या भररस्त्यावर उभ्या राहायच्या. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वेलकम पॉईन्ट नागपूर मार्गावर असल्यामुळे नेहमी या ठिकाणाहून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू राहते. एखाद्यावेळी या ठिकाणी अपघाताची घटना होवू शकते, त्यामुळे या चौकातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटवण्याचे आदेश यापुर्वी पोलिस आयुक्तांनी पुर्व वाहतूक शाखेला दिले होते मात्र त्यांनी शुक्रवारपुर्वी प्रभावी कारवाई केली नव्हती. 

त्यामुळेच शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त स्वत: वेलकम पॉईन्टवर पोहचले त्यांनी बहुतांश अतिक्रमण त्यांच्या पथकाव्दारे दूर केले होते. कारण या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सदैव वाहतूक पोलिस कार्यरत असतात मात्र ते वाहतूक नियंत्रण करण्याचे सोडून नागपूरकडून शहरात येणाऱ्या वाहनांना अडवून ‘कारवाई’ करण्यातच मग्न असतात. तेही वेलकम पॉईन्टपासून किमान शंभर मीटर पुढे सावलीत उभे राहून त्यांचे वाहतूक नियंत्रण सुरू असते. मग हे काम केव्हा करणार. त्यामुळे शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्तांनी स्वत:च वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर असलेल्या काही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...