आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Employee Dead On Duty By Heart Attack In Amravati

कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस आयुक्तालयातील स्थानिक गुन्हे शाखा विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संतोष शिखरे (४२) यांचे शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मध्य रात्री मोझरी येथील एका आरोपीचा शोध घेऊन ते घरी परत आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दुपारी पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात बिगुल वाजवत आणि बंदुकीतून फैरी झाडत त्यांना सलामी देण्यात आली.

आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेले संतोष हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते. गुन्हे शाखा विभागात येण्यापूर्वी त्यांनी राजापेठ, वाहतूक शाखा अशा अनेक ठिकाणी काम केले होते. संतोष यांच्या अचानक निघून गेल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलिस आयुक्तालयातील अनेक त्यांचे सहकारी हे त्यांच्यासोबतच पोलिस खात्यात रुजू झाले होते. तेव्हापासून या सहकाऱ्यांसमवेतच त्यांनी आपली नोकरी केली. त्यांच्या अचानक निघून गेल्याने त्यांच्या सहकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यदक्ष पोलिस गमावल्याच्या प्रतिक्रिया संतोष यांच्या सहकाऱ्यांनी दिल्या. पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात संतोष यांना सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त नितीन पवार, पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इतर विभागांतील अधिकारी कर्मचारी तथा पोलिस कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलाराम नगरात शोककळा
पोलिस खात्यात संतोष यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. परिसरातही जलरामनगरात ते लोकप्रिय होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरातही त्यांनी एक वेगळी आेळख निर्माण केली होती. संतोष यांच्या अचानक निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांसोबतच जलारामनगरात शोककळा पसरली होती.

मुलीचा होता बारावीचा पेपर
संतोष यांना एक मुलगी एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी बारावीत, तर मुलगा पाचवीत शिक्षण घेत आहे. मुलीचे बारावीचे पेपर सुरू असल्याने त्यांच्या निघून गेल्याच्या बातमीने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा आज पेपरही होता, अशा परिस्थितीत पेपर होईपर्यंत मुलीला कुठलीही माहिती होणार नाही, याची काळजी घेतली.
पोलिस कर्मचारी संतोष शिखरे यांना पोलिस मुख्यालयात अखेरची सलामी दिली.