आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेनेच्या अध्यक्षाला ठाणेदाराकडून मारहाण, खाकीची दबंगगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : आर्णी येथील युवासेनेच्या अध्यक्षांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली.
आर्णी - पोलिसांनी पकडून आणलेल्या मित्राला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या युवासेनेच्या अध्यक्षाला आर्णी ठाणेदाराने विनाकारण मारहाण केली. विशेष म्हणजे, राग अनावर झाल्यामुळे ठाणेदारांनी चक्क कानशिलावर बंदूक लावण्याचा आरोप युवासेनेचे अध्यक्ष नीलेश मस्के यांनी केला. हा प्रकार शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास आर्णी पोलिस ठाण्यात घडला. दरम्यान, याची माहिती मिळताच शेकडोंच्या संख्येत शिवसैनिकांनी पोलिस ठाणे गाठले. थोड्या वेळासाठी शहरात तणाव निर्माण झाला होता.

आर्णी तालुक्यातील देऊरवाडी येथील नीलेश आठवले यांना एका प्रकरणात पोलिसांनी ठाण्यात आणले होते. त्यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, युवासेनेचे अध्यक्ष नीलेश मस्के ठाण्यात गेले होते. त्याच वेळी ठाणेदार संजय खंदाडे हे नीलेश आठवले याला विचित्र पद्धतीची वागणूक देत होते. आठवले यांना एका पायावर उभे ठेवून विनाकारण मारहाण सुरू केली. कुणालाही ताब्यात घेतल्यानंतर असे करणे गैरकृत्य आहे. दरम्यान, युवासेनेचे अध्यक्ष नीलेश मस्के यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे यांच्या मोबाइलमध्ये हा प्रकार टिपला. याची भनक ठाणेदार खंदाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच नीलेश मस्के याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणे सुरू केले. घटनास्थळी खुद्द जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हजर होते. ठाणेदाराचा राग अनावर झाल्याने वर्दीचा रुबाब दाखवत चक्क कानावर रिव्हॉल्वर लावली आणि या प्रकाराची वाच्यता तू जर इतरत्र केली, तर तुझा एन्काउंटर करू, अशी धमकी दिली. त्याच वेळी जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांच्या हातातील मोबाइल हिसकावून मारहाण करताना काढलेली चित्रफीत डिलीट केली. मात्र, प्रवीण शिंदे यांनी ती चित्रफीत पहिलेच इतरत्र पाठवून दिली होती. हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ठाणेदाराचा फसला. याची माहिती मिळताच शेकडोंवर शिवसैनिकांनी थेट पोलिस ठाण्यावर धडक दिली. युवासेनेच्या अध्यक्षाला केलेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचप्रमाणे आर्णी ठाणेदाराविरोधात पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. ही तक्रार सध्यातरी पोलिसांनी चौकशीतच ठेवली आहे. काही वेळासाठी माहूर चौकात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, जमलेल्या शिवसैनिकांनी शांततेच्या मार्गाने तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, तालुकाप्रमुख रवी राठोड, नगरपालिकेचे गटनेते प्रवीण मुनगिनवार, रमेश ठाकरे, स्वप्निल सेठे यांच्यासह शेकडोंवर शिवसैनिक हजर होते. :पोलिसठाण्यामध्ये आलेला आरोपी असो अथवा नसो त्याला बाजीराव देऊन वेगळी छबी निर्माण करण्याचा ठाणेदार संजय खंदाडे वारंवार प्रकार करतात, असा आरोप या ‌वेळी करण्यात आला.

अन्यथा शिवसेना रस्त्यावर
माझ्यासमोर ठाणेदारांनी युवासेनेच्या पदधिकाऱ्याला मारहाण केली. एखाद्या प्रकरणातील दोषीवर खुशाल कारवाई करावी. मात्र, मारहाण करणे हे कोणत्या नियमात बसत नाही. मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन ठाणेदारांनी केले. त्यांच्यावर कारवाई हकालपट्टी झालीच पाहिजे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. प्रवीण शिंदे, सदस्य,जिल्हा परिषद.

ठाणेदारांची बदली करा
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आर्णीच्या ठाणेदारांची त्वरित बदली करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आम्ही दोन दिवसांचा प्रशासनाला अल्टिमेटम दिला. या दोन दिवसांत ठाणेदारांवर कारवाई करून बदली केली नाही, तर शिवसेना उग्र आंदोलन करील. याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील. रवी राठोड, तालुकाप्रमुख,शिवसेना.