आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आॅपरेशन आॅलआऊट’ , पोलिस आयुक्तांसह सर्व अधिकारी,कर्मचारी रात्रभर रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात वाढलेली गुन्हेगारी, दुचाकीस्वारांची स्टंटबाजी मध्यरात्री घडणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा दरारा कायम राहावा,यासाठी खुद्द पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत शनिवारी (दि. २२) रात्रभर ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबविल्याने समाजकंटकांमध्ये धडकी भरली आहे. आयुक्तांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ मिनीटात पोलिस आयुक्तांसह दोन डीसीपी, सर्व एसीपी, सर्व ठाणेदार यांच्यासह गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी शनिवारी शहरातील सर्व मार्गावर रात्रभर फिरताना आढळून आल्याने नागरिकही बुचकळ्यात पडले होते.
दसऱ्याच्या दिवशी पालकमंत्र्यानी अवैध व्यवसायावर टाकलेली धाड. या प्रकरणाची धुळवड शांत होत नाही तोच गुन्हे शाखेचे पीआय अनिल किनगे यांना लाच प्रकरणी एसीबीने अटक केली. या दोन मोठ्या प्रकरणांमुळे अवघे शहर पोलिस दल हादरले. या व्यतिरीक्त शहरात वाढलेल्या चोऱ्या, दुचाकी चोरी, घरफोडी यांना आवर घालने अद्यापही पोलिसांना शक्य झाले नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये पोिलसांचा धाकच उरला नसल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, पोिलस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अख्खे पोिलस दल शनिवारी रात्रभर रस्त्यांवर उतरवल्याने मात्र गुन्हेगारांमध्ये दरारा निर्माण झाला.

शनिवारी रात्रीचे ११ वाजले होते. रात्र पाळीत ड्युटीवर नसलेले सर्व अधिकारी कर्मचारी घरी गेले होते. दरम्यान ११ वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्त स्वत: रस्त्यावर आले. वॉकीटॉकी सेटवर ताबा घेतला आणि त्यांनी प्रत्येक ठाणेदार, एसीपी डीसीपींना ‘ऑनरोड’ येण्याच्या सूचना दिल्या. याचदरम्यान पोलिस उपायुक्त झोन विवेक पानसरे यांनाही ‘आॅपरेशन आॅलआऊट’च्या सूचना देण्यासाठी पाेलिस आयुक्त वॉकीटॉकीवरून मॅसेज देत होते. हे मॅसेज ऐकून प्रतिसाद देण्याची जबाबदारी उपायुक्तांचे शनिवारी कर्तव्यावर असलेले आरटीपीसी मनीष नशीबकर यांंची होती. सीपींंनी वारंवार मॅसेज देऊनही अपेक्षित वेळात आरटीपीसी नशीबकर यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने सीपींनी नशीबकर यांना त्याचप्रमाणे नागपुरी गेट ठाण्यातही वारंवार वॉकीटॉकीवरून मॅसेज दिले. मात्र वेळीच प्रतिसाद मिळाल्यामुळे शनिवारी रात्री आरटीपीसी असलेल्या महिला पोलिस नाईक अाशा बरडे यांना मध्यरात्री १२ वाजता तत्काळ मुख्यालयात बदली करून गार्ड ड्युटी लावण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे या दोन्ही पोलिसांवर झालेली कारवाईसुध्दा वॉकीटॉकीवरून झाली. त्यामुळे सर्व आयुक्तालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना या कारवाईची माहिती मिळाली होती. त्यानंतर मात्र अवघ्या दहा मिनीटात पोलिस आयुक्तालय शहरातील रस्त्यावर आले. त्यामुळे अचानक शहरातील प्रत्येक मार्गावर पोिलस दिसत होते. पोलिसांचे टार्गेट होते रस्त्याने टवाळक्या करणाऱ्या टोळके, बेभान दुचाकी हाकणारे मस्तवाल युवक, कारण नसतांनाही चौकाचौकात बसून बाता ठोकणारे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकं, शहरात प्रवेश करणारी प्रत्येक चारचाकी दुचाकी इतरही जे कायद्याबाहेर आहे. दरम्यान यावेळी केवळ ‘व्हीक्टर कॉलिंग’ इतकेच ऐकायला येत होते. कारण पोलिस आयुक्त प्रत्येक अधिकाऱ्याला कुठे आहे, काय कारवाई झाली याबाबत वारंवार विचारणा करत होते. पोलिसांनी राबवलेल्या या आकस्मिक ‘आॅपरेशन आॅलआऊट’मुळे शहरात मध्यरात्री फिरणाऱ्यांनाही पोलिसांच्या ‘सरप्राईज’ कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या कारवाईदरम्यान शहरातील पठाण चौक, नागपुरी गेट, इतवारा, राजापेठ, गोपालनगर, गाडगेनगर, पंचवटी, वेलकम पॉईन्ट, बडनेरा इतर ठिकाणीसुध्दा पोलिसांचा दरारा शनिवारी रात्रभर कायम होता. पोलिस आयुक्त मंडलीक स्वत: पठाण चौकात कारवाई करत होते. दरम्यान बडनेरा जुनीवस्तीमध्ये भावना दुखावल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. त्यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद शांत केला.

नागरिकांमध्ये कुतुहल आणि भितीही
शहरातअचानक राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ऑलआउट’ दरम्यान प्रत्येकच मार्गावर पोिलस दिसून आल्याने शहरात नेमके काय झाले असा प्रश्न जनसामान्यांना पडला. प्रत्येकच मार्गावर पोलिसांचा शनिवारी मध्यरात्री ११ वाजतापासून सुरू झालेली कारवाई रविवारी पहाटेपर्यंत सुरूच होती. या कारवाईदरम्यान १६ हद्दपार व्यक्तींना तपासण्यात आले. हद्दपार घरीच मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई केली. तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या ३० गुन्हेगारांची तपासणी केली. नाकाबंदी लाऊन ११० वाहनांची झडती घेतली. त्यापैकी २१ वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात आली. २२ हॉटेल धाब्यांची तपासणी केली. अवैध दारुविक्री करणाऱ्या तिघांविरुध्द कारवाई केली. तसेच एका तडीपाराला अटक केली आहे. या कारवाईमध्ये सर्व एसीपी, ठाणेदार, सायबर क्राईमचे प्रमुख एपीआय काचंन पांडे, एपीआय फिरोज खान पठाण, गुन्हे शाखेचे पीएसआय प्रविण पाटील, प्रविण वेरुळकर यांच्यासह सर्व कर्मचारी हजर होते.

दरदिवशी होईल कारवाई
^शहरातील कायदा,सुव्यवस्था कायम राखून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आम्ही शनिवारी मध्यरात्री‘आॅपरेशन आॅलआऊट’ राबवले.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री कारवाई सुरूच राहील. असे ऑपरेशन आठवड्यातून दोनवेळा राबवले जाईल. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त, अमरावती.

एसीपींना बोलावण्यासाठी घरी पोहचला एक पोलिस
आकस्मिकपणे राबवलेल्या ‘आॅपरेशन आॅलआऊट’मध्ये सहभागी होण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या सांगण्यावरून एका एसीपींना फोन लावला, मात्र वारंवार फोन लावूनही त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे एक पोलिसच त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या घरी पोहचला होता. त्यानंतर मात्र एसीपी उठले कर्तव्यावर हजर झाले.

बातम्या आणखी आहेत...