आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस फोनवर म्हणतील 'जय हिंद', ‘नमस्ते'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस ठाण्यात, पोलिस नियंत्रण कक्षात किंवा पोलिस विभागात फोन लावल्यास फोन उचलणाऱ्या पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी केवळ जयहिंद किंवा नमस्ते, असेच बोलून आपला संवाद सुरू करायचा. या वेळी फोन उचलणाऱ्याने स्वत:चे पद सांगण्याची गरज नाही. नाव मात्र जरूर सांगावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील पोलिसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश देणारे पत्र नुकतेच अमरावती पोलिसांना प्राप्त झाले आहे.

डिसेंबर २०१५ मध्ये गुजरात राज्यातील भुजमध्ये देशातील सर्व राज्यांचे पोलिस महासंचालक तसेच पोलिस महानिरीक्षकांची बैठक झाली होती. यापुढील काळात पोलिसांनी फोन उचलल्यानंतर केवळ जयहिंद किंवा नमस्ते या दोनच शब्दांचा वापर करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कारण अनेकदा पोलिसांकडून फोनवर जयहिंद किंवा नमस्ते या शब्दाव्यतिरिक्त अन्य शब्दांचा वापर केला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असावे, त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संपूर्ण राज्यातील पोलिसांना या निर्णयाचा अंमल करायचा आहे. त्यामुळे हा निर्णय घेऊन राज्याचे प्रशिक्षण खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी एका पत्राद्वारे हे आदेश राज्यभरातील घटकप्रमुखांना नुकतेच दिले आहेत. संबंधित घटकप्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना तातडीने या सूचना देऊन हा बदल करण्यासाठी सांगावे, असेही त्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिसांना फोनवर तरी या दोनच शब्दाद्वारे अभिवादन करावे लागणार आहे.

नव्या निर्णयाचा अंमल होईल
दूरध्वनी स्वीकारणाऱ्या पोलिसाने यापुढे केवळ जयहिंद किंवा नमस्ते म्हणावे, असे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाकडून नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात त्या निर्णयाचा अंमल करण्यात येणार आहे. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त