आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Take Five Foreign Students For Investigation

पाच विदेशी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी, पुण्यात शिकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अफगाणिस्तानातील तीन, नायजेरिया आणि इराक येथील प्रत्येकी एक असे पाच विदेशी युवक शहरात आल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना शहरातील एका लॉजवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती ते पुण्यात शिकत असून, शहरातील एका महाविद्यालयात आयोजित परिसंवादाकरिता आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा पोलिसांकडून विदेशी व्यक्तींसाठी मिळणारे परमिटसुद्धा नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या शिक्षकांसाेबत संपर्क साधून खात्री केल्यानंतर त्यांना सोडून दिले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२) घडला.
अब्दुल सनुल, जागी नसीउल्लाह आणि सोहेल हमीद (तिघेही अफगाण), एजकील बोक (नायजेरिया) आणि हैदर मलीक मोहम्मद (इराक) अशी विदेशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे पाचही जण पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असून, शहरात एका महाविद्यालयात आयोजित सेमिनारसाठी ते शहरात आले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, विदेशी व्यक्तीने ज्या शहरात राहण्याची परवानगी आहे, त्या शहराव्यतिरिक्त इतर कोणत्याही शहरात जायचे असल्यास त्या शहरातील 'फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिसर'कडून परमिट काढणे आवश्यक असते. त्यामुळे या पाचही जणांनी पुण्यातील 'फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिसर'कडून परमिट घेणे आवश्यक होते तसेच अमरावतीत आल्यानंतर शहरातील 'फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिसर'कडून तात्पुरत्या स्वरूपात मिळणारे परमिट घ्यायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी यापैकी काहीही केले नव्हते. दरम्यान, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर ते थांबले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्याकडे व्हिसा, पासपोर्ट किंवा परमिट नव्हते. हे पाचही जण पुणे विद्यापीठात बीए (अर्थशास्त्र) शिकत आहेत. शहरातील एका महाविद्यालयात आयोजित परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. मात्र, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे कागदपत्रं नव्हते. त्यामुळे शहर पोलिस दलाच्या एटीएस पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के त्यांच्या पथकाने त्यांना चौकशीसाठी कार्यालयात आणले. त्यांचा पासपोर्ट, व्हिसा तसेच पुण्यातील परमिट फॅक्सद्वारे बोलवून घेतले. तसेच पुण्यातील 'फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिसर'सोबत संपर्क करून यांच्या पुण्यातील वास्तव्याबाबत खात्री केली. या संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. तसेच या वेळी त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात रजिस्ट्रेशनसुद्धा पोलिसांनी केले. हे पाचही जण शुक्रवारी (दि. २२) रात्रीच पुण्यात परत जाणार होते.

विद्यापीठाला देणार पत्र : आगामीकाळात विद्यापीठात होणारे परिसंवाद इतर कार्यक्रमांसाठी विदेशी पाहुणे येत असल्यास त्यासंबंधीची माहिती विद्यापीठाने पोलिसांना कळवावी, यासाठी शहर पोलिसांकडून विद्यापीठाला पत्र दिले जाणार आहे.

चौकशी अंती केली त्यांची सुटका : पाचविदेशी युवक शहरात आल्याची माहिती मिळताच आम्ही त्यांना ताब्यात घेतले. व्हिसा, पासपोर्ट किंवा परमिट नव्हते. पुण्यात संपर्क करून खात्री केल्यानंतर त्यांना सोडल्याचे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.