आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटिकल राडा, आक्षेपार्ह वक्तव्याचा भडका, भाजप स्वाभिमानी ‘भिडले',

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबाबतीत केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शुक्रवार, १५ एप्रिलला भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते निषेध नोंदवण्यासाठी आमदार रवी राणा यांच्या शहरातील कार्यालयावर गेले होते. त्या वेळी युवा स्वाभिमानचे भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांनी एकमेकांवर जोडे, चपला, विटांचा मारा केला, खुर्च्यांची फेकफाक केली. यामध्ये कार्यालयाची काही प्रमाणात तोडफोड झाली. या वेळी भाजपचे दोन पदाधिकारी जखमी झाले.
कार्यालयात तोडफोड झाल्यामुळे आमदार राणा त्यांचे समर्थक संतप्त झाले तेसुद्धा रस्त्यावर उतरले होते. शनिवारी दिवसभर राजापेठ भागात तणाव होता. दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री पोटे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याची ‘व्हिडिओ क्लिप' १४ एप्रिलला सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. शुक्रवारी राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी काही कार्यकर्ते दुपारी १२ वाजता रवी राणा यांच्या राजापेठ परिसरातील भोंगाडे कॉम्प्लेक्सस्थित पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात पोहोचले होते. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार राणांच्या वक्तव्याचा निषेध करून घोषणाबाजी केली तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आमदार रवी राणा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तेवढ्यातच अचानकपणे दोन्ही गट एकमेकांसोबत भिडले. काही वेळातच विटांचा मारा सुरू झाला. काठ्यासुद्धा मारल्या जात होत्या. राणा यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागतांना बसण्यासाठी असलेल्या स्टीलच्या अवजड खुर्च्यासुद्धा उचलून एकमेकांवर उगारण्यात आल्या. या हाणामारीत ‘भाजयुमो’चे शहर अध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दोन्हीगटांचा जमाव आवाक्याबाहेर : यावेळी राजापेठचे ठाणेदार शिवा भगत मोजकेच पोलिस उपस्थित असल्यामुळे दोन्ही गटांचा जमाव पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेला. पोलिसांनाही ते जुमानत नव्हते. मात्र, काही वेळाने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कसेबसे युवा स्वाभिमानच्या कार्यालयातून बाहेर काढले. या वेळी आमदार राणा यांच्या कार्यालयाजवळच असलेल्या एका खोलीतून काही व्यक्तींनी भंगारात असलेला लोखंडी पंखा, प्लास्टिकच्या खुर्च्या, लाकडी पाट्या वरून खालच्या दिशेने फेकून मारल्या होत्या. यामध्ये एक युवक जखमी झाला. विशेष म्हणजे हा युवक भाजप किंवा युवा स्वाभिमानचा नव्हता. तो भोंगाडे कॉम्प्लेक्समध्ये ग्राहक म्हणून आला होता. या प्रकारानंतर आमदार रवी राणा आपल्या समर्थकांसह बाजूलाच असलेल्या राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले होते. दरम्यान, त्याच वेळी भाजपचे पदाधिकारीसुद्धा तक्रार नोंदवण्यासाठी ठाण्यात आले होते. भाजप युवा स्वाभिमानने एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवल्या होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त नितीन पवार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, एसीपी मिलिंद पाटील यांच्यासह पोलिसांची मोठी कुमक राजापेठ परिसरात दाखल झाली होती. दरम्यान, आमदार रवी राणा काही समर्थकांनी दुपारी वाजतापासून वृत्त लिहीस्तोवर (रात्री ८) पर्यंत ठाण्यातच ठिय्या ठोकला. कार्यालयात येऊन तोडफोड करणारे भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. या प्रकारामुळे राजापेठ परिसरात दिवसभर प्रचंड तणाव होता. पोलिसांनी युवा स्वाभिमान भाजप कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता तसेच ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात होती.

आम्ही निषेध नोंदवण्यासाठी गेलो होतो
आमदार राणा नेहमीच विवादास्पद भाष्य करतात. असेच एक वक्तव्य त्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बाबतीत केले. या प्रकरणात पालकमंत्री पोटे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. म्हणून आमदार राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच पहिली '‘रिअॅक्शन' आली. आम्हाला काहीच करायचे नव्हते. उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत आमचे दोन पदाधिकारी गंभीर झाले आहे.
दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप.

तक्रारी प्राप्त, दोषींवर गुन्हे दाखल होणार
^दोन्हीगटांकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. आता परिस्थिती शांत आहे. नितीन पवार, पोलिसउपायुक्त.

गुन्हे दाखल करून हल्लेखोरांना अटक करा
^कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. हल्लेखोर भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. पालकमंत्री पोटे यांनी राजीनामा द्यावा. रवी राणा, आमदार,बडनेरा

विरोध करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाहीे
^अमरावतीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्यात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. प्रवीण पोटे, पालकमंत्री,अमरावती.

बातम्या आणखी आहेत...