आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा नेतृत्वावर राहणार आगामी महापालिका निवडणुकीची धुरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये युवा रक्ताची भूमिका निर्णायक ठरली आहे. धाडसी निर्णय घेऊन समाजकारण आणि राजकारणातील प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याची क्षमता तरुण नेतृत्वाने नेहमीच सिद्ध केली आहे. देशातील पर्यायाने शहरातील जनतेलाही तरुण नेतृत्वाची लागलेली आस लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील महत्त्वपूर्ण पद तरुण नेत्यांकडे दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीची धुराही युवा नेतृत्वावर अवलंबून राहणार असल्याचे चित्र शहरातील राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.

विद्यमान महापालिकेचा कार्यकाळ पुढील वर्षी संपुष्टात येणार असल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मागील वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीने केंद्र तसेच राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटून टाकले आहे. राजकीय परिवर्तनाचा परिणाम विविध ठिकाणी होत असलेल्या निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे वर्तमान सत्ताधाऱ्यांना महा पालिकेवरील सत्ता टिकवून ठेवणे तर अन्य राजकीय पक्षांकडून सत्ता प्राप्त करण्याचे प्रयत्न होणार आहे. महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, युवा नेत्यांच्या जबाबदारीत देखील वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक दृष्टिने शहराध्यक्षपदी जयंत डेहनकर यांची निवड केली, तर महापालिकेतील धुरा तुषार भारतीय, संजय अग्रवाल या तरुण नेतृत्वाकडेच दिली आहे. भाजपच्या महिला आघाडीत देखील युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने देखील महानगरप्रमुख पदावर सुनील खराटे यांची निवड करून तरुण नेतृत्व दिले अाहे, तर महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद देखील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेल्या प्रवीण हरमकर यांच्याकडे सोपवले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीवर देखील युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली. सत्ताधारी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते तर महापालिकेत पक्ष नेता असलेले बबलू शेखावत यांच्याकडे जबाबदारी असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील शहराध्यक्ष पदावर प्रा. राजेश शिरभाते तसेच महापालिकेत सुनील काळे या तरुण नेत्यांना नेतृत्वाची संधी बहाल केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)चे नेतृत्व शहराध्यक्ष तथा नगरसेवक भूषण बनसोड यांच्याकडे राहणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या नेतृत्वाची धुरा प्रकाश बनसोड यांच्यावर राहणार आहे. बहुजन समाज पक्षाने मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणुकीत दीपक पाटील या तरुण नेत्यास संधी दिली.

जनतेने देखील साथ देत महापालिकेवर निवडून दिले. महापालिकेत दीपक पाटील तर शहरात सुदाम बोरकर यांच्या रुपाने बहुजन समाज पक्षाचे तरुण नेतृत्व समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनने युवा नेता संतोष बद्रेंना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नीळकंठ ढोके, उमेश बनसोड, इंडीयन मुस्लीम लीगने नगरसेवक इमरान अशरफी, शेतकरी संघटनेने सुनील शेरेवार आदी तरुण नेत्यांना जनसेवेसाठी पुढे केले आहे.

महापालिकेवर एक हाती सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. स्पष्ट बहुमत मिळेल इतक्या संख्याबळाने नगरसेवक निवडून यावेत म्हणून प्रमुख राजकीय पक्षांकडून नियोजन केले जात आहे.

निवडणूक अस्तित्वाची लढाई
प्रारंभीपासून काही नेते मनपामध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे काही प्रभागावर त्या नेत्यांची पकड मजबूत असल्याचे निदर्शनास येते. मात्र चार सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याने सतत निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी देखील ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

प्रभाग रचना आव्हानात्मक
पूर्वीची प्रभाग रचना बदलली असून आता एका प्रभागात चार सदस्य राहणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना नवीन मतदारांसमोर जावे लागणार आहे. मतदारांची संख्या देखील दुपटीने वाढणार असल्याने निवडून येण्यासाठी दांडगा जनसंपर्क असणे महत्वाचे ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...