आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समान नागरी कायद्याबाबत 'आरएसएस'ची भूमिका दुटप्पी - अॅड. प्रकाश आंबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - काँग्रेससत्तेत असताना मागणी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समान नागरी कायद्याबाबत दुटप्पी भूमिका असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. भारिप-बहुजन महासंघ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयोजित जाती अंत लढा परिषदेच्या निमित्याने सायन्सस्कोर मैदान येथील जाहीर सभेत ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बोलत होते.

देशातील तरुण आज स्वत:चे आयुष्य ठरवतोय, बदलाची भाषा करतोय; मात्र त्याला जुन्या व्यवस्थेत बांधण्याचे कार्य होत आहे. या निमित्याने जातीचा कॉलम हटवून टाका, अशी मागणी आम्ही या जाती अंत परिषदेतून करीत अाहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य आहे का, असा सवाल अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केला. काँग्रेसचे सरकार असताना समान नागरी कायदा रास्वसंघाला हवा होता. मात्र काही धर्मियांना नको आहे म्हणून समान नागरी कायदा भाजप लागू करणार नाही. जाती-पातीच्या बंधनात अडकून असलेल्या समाजामध्ये देशाच्या स्वातंत्र्याने सामंजस्याची भूमिका रुजविली. समान नागरी कायदा लागू केल्यास खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे बीज या मातीत रुजले जातील. त्यामुळे भारताला हिंदू धर्म राष्ट्र करता येणार नाही ही भिती रास्व संघाला असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. मनुवादाचा विरोध करीत संतांनी वैदिक परंपरेला नाकारले आहे. भगवा गौतम बुद्ध, चार्वाकांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत वैदिक परंपरा नाकारण्याची उदाहरणे आहेत. चार्वाक ते संत तुकाराम महाराज या संत परंपरेचा सार भारतीय संविधानात आहे. संतांची ही शिकवण पुढे गेल्यास वैदिक परंपरेला छेद जाईल म्हणून संविधान बदलण्याची भाषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. संघाचा राष्ट्रवाद बेगडी असल्याचे संबोधत आम्ही कामगार, दलित, मानवतेचा राष्ट्रवाद सांगत अाहे. स्वत: बाबत साशंक असलेले शंका घेतात, असे उदाहरण देत सांस्कृतिक राष्ट्रवाद खुल्या चर्चेत सांगण्याचे आव्हान अॅड. आंबेडकर यांनी संघाला दिले. भारतीय राज्य घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. कोणत्याही नागरिकांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करु शकत नाही. आम्ही अस्सल आरक्षणवादी असून जाती-जातीत विभागण्याचे कार्य आरएसएस करीत अाहे. जाती-जातीत भांडणे लावत सामंजस्य-मैत्री संपविण्याचे काम करीत असून त्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

आरक्षण संपविण्याचे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच ते हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी जनसमुदायास केले. आरक्षणवाद्यांचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेत विविध १३ ठरावांना मान्यता देण्यात आली. यावेळी मंचावर भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, मनोहर देशकर, अकोला जि.प.च्या अध्यक्षा संध्या वाघोडे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, प्रा. विनायक दुधे, सुनील मेटकर, उदयन शर्मा, अनिल बरडे, प्रतिभा अवचार, प्रा. मधुकर पवार, अनिल बरडे, ज्योती वानखडे, गुणवंत देवपारे, प्रसन्न गवई, कांशीराम साबळे, अशोक साेनारकर आदी उपस्थित होते.
जाती अंताचा लढा परिषदेत मार्गदर्शन करताना अॅड.प्रकाश आंबेडकर,बाजूला मान्यवर.
सायंन्सकोर मैदान येथे आयोजित जाती अंताचा लढा परिषदेला उपस्थित जनसमुदायाला भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन करून आरएसएसच्या भूमिकेवर टीका केली.

हुकूमशाही की लोकशाही क्रांती : सर्वराजकीय पक्षाच्या नेत्यांचा राजकीय वर्ग घेताना १९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार-कष्टकऱ्यांचा राष्ट्रवाद विशद केला होता. जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते. मात्र आज जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याकरता सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवाद पुढे केल्या जात आहे. जर्मनीत हिटलरची देखील अश्याच प्रकारचा राष्ट्रवाद होता. त्यामुळे हुकूमशाही हवी की लोकशाही क्रांती असा प्रश्न भालचंद्र कांगो यांनी उपस्थित केला.

डॉ. हेडगेवारांनी नेताजींना भेट का नाकारली ? : ब्रह्मदेशमार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस सशस्त्र लढाई करीत इंग्रजांना पराभूत करीत होते. यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्य मिळावे म्हणून नेताजी नागपूर येथे सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांना भेटावयास आले होते. मात्र सरसंघचालक नेताजींना भेटले नसल्याचे पुस्तकात नमूद आहे. स्वत:ला राष्ट्रवादी म्हणविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा खुलासा करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी सभेत व्यक्त करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...