आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संमेलनाला तरुण चेहरा देण्यासाठी उमेदवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवीण दवणे - Divya Marathi
प्रवीण दवणे
नागपूर - ‘आतापर्यंतची संमेलने अतिज्येष्ठांची झाली. त्यामुळे ऐकणारे श्रोतेही समवयस्कच होते. असे असले तरी संमेलनाला तरुण चेहरा देण्यासाठी माझी उमेदवारी आहे,’ अशी भूमिका डोंबिवली येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण दवणे यांनी मांडली.
संमेलनात महाविद्यालयीन युवक- युवतींचा सहभाग वाढावा यावर माझा विशेष भर राहील. कारण निसटत चाललेली भाषा तसेच वाचन संस्कृती टिकवण्याचे काम हीच पिढी करणार आहे. ही तरुण पिढीच भविष्यातील वाचक राहणार आहे. वाचक राहिले तरच लेखकाच्या अस्तित्वाला काही अर्थ राहील,’ असेही ते म्हणाले.
‘ज्येष्ठता वाढत्या वयाने साेबत येतेच; पण संमेलन निवडणुकीत कर्तृत्वाचीही ज्येष्ठता हवी. अलीकडे कोणत्याही कारणाने का होईना कर्तृत्वाने मोठी माणसे निवडणुकीत उभे राहत नाहीत. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत महेश एलकुंचवार, अनिल अवचट, आशा बगे अशी उत्तुंग कर्तृत्वाची माणसे असती तर संमेलनात पहिल्या रांगेत बसून मी त्यांची भाषणे ऐकली असती. आता आम्ही सर्वच उमेदवार समान कर्तृत्वाचे आहाेत. माझा प्रतिस्पर्धी कोणीही नाही. कारण मी दुसऱ्याला पाडण्यासाठी नव्हे तर स्वत: निवडून येण्यासाठी उभा अाहे,’ असे दवणे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक ही संमेलनाचा अपरिहार्य भाग आहे; पण यामुळे फार मोठी माणसे भरडली गेली. इंदिरा संत पराभूत होऊन रमेश मंत्री निवडून आले होते. मंत्री हे निर्विवाद उत्तम विनोदी लेखक होते. इंदिरा संतांसाठी त्यांनी माघार घेतली असती तर त्या अविरोध आल्या असत्या; पण निवडणुकीच्या राजकारणात असे क्वचितच होते, असे दवणे म्हणाले.

राजकारणीही रसिक असतो
व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर असण्यावर नेहमीच आक्षेप घेतला जातो; पण राजकारणी हाही रसिकच असतो. त्यालाही साहित्याची भूक असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारण्यांची परंपरा लाभलेली आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, स्व. विलासराव देशमुख ते विद्यमान मुख्यमंत्र्यांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे राजकारण्यांना आपला विरोध नाही, असे दवणे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...