आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रीतीने उचलला सुवर्णाचा भार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आपल्या खेळाच्या आवडीसाठी खडतर परिश्रम घेणाऱ्या शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रीती देशमुखने राज्यस्तरीय शालेय भारोत्तोलन स्पर्धेत सर्वाधिक वजन तोलून सुवर्णपदक जिंकले.रायगड येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या प्रीतीने मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात क्लीन जर्क तसेच स्नॅच प्रकारात सर्वाधिक वजन तोलून हे यश संपादन केले आहे.

यासाठी प्रीतीसह तिच्या आई-वडीलांचेही तेवढेच योगदान राहिले आहे. मुलीने शिक्षणासोबतच खेळातही नाव काढावे या भावनेने झपाटलेल्या पालकांनी सदोदित तिला प्रोत्साहन देत कठोर परिश्रम घेत राहा एक दिवस तुला नक्कीच यश मिळेल, असा आशेचा किरण दाखवला. त्यामुळे कोणत्याही अपयशाने खचून जाता प्रीती सकाळी सायंकाळी दोन तास भारोत्ताेलनाचा सराव करीत राहिली. अखेर तिला यश मिळाले. मुलींना जर योग्य संस्कार, आहार दिला तर त्या मुलांपेक्षा कुठेही मागे राहत नाहीत, असा प्रगल्भ विचार तिच्या शेतकरी आई-वडीलांनी व्यक्त केला तो इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

भारोत्तोलन या खेळासाठी सरावा सोबतच तंदुरुस्तीसाठी पोषक आहाराची आवश्यकता असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करावा लागतो. वेळप्रसंगी इतर कामे बाजुला ठेऊन प्रीतीच्या पालकांनी मुलीला दररोज चांगला आहार कसा मिळेल याची काळजी घेतली. त्याचे फळ अमरावती शहराला मिळाले आहे. प्रीतीच्या रूपात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारोत्तोलक मिळाली असून राष्ट्रीय स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा असल्याचे मत तिचे शारीरिक शिक्षक परेश तिवारी व्यक्त केली. प्रीती शारीरिक शिक्षक तिवारी, वृषाली देशमुख, श्वेता वानखडे यांचे शाळेच्या संचालिका राज के.चव्हाण, विश्वस्त विवेक छाबडा, कमलेश बिसेन, निना बिसेन, मुख्याध्यापिका अर्चना मालाणी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
डाॅ. चावला यांची शिष्या
नवव्या वर्गात शकणारी प्रीती देशमुख ही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे भारोत्तोलन मार्गदर्शक डाॅ. चावला यांची शिष्या आहे. राजापेठ येथील जवाहर व्यायाम शाळेत ती नियमितपणे सराव करते. माजी खेळाडूंनी जेतेपद मिळाल्यानंतर त्यांना जो रोख पुरस्कार मिळाला त्यातूनच ही व्यायामशाळा साहित्य उभे राहिले आहे.
छायाचित्र: राज्यस्तरीय शालेय भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रीती देशमुख.
बातम्या आणखी आहेत...