आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी संप चिघळला, प्रवासी बेहाल; महामंडळाला - 60 काेटींचा फटका; चर्चेच्‍या फेऱ्या अपयशीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. गेल्या ४२ तासांमध्ये राज्याच्या २५० डेपोमधून केवळ ८० बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. परिणामी राज्यभरातील प्रवाशांचे संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी दहापट भाडे मोजून प्रवाशांना इच्छित स्थळी जावे लागले. दोन दिवसांत एसटी महामंडळास सुमारे ६० कोटींचा फटका बसला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते व एसटी कर्मचारी संघटनांची चर्चा सुरू हाेती, मात्र रात्री उशिरापर्यंत त्यावर ताेडगा निघाला नव्हता.  दरम्यान, नगर जिल्ह्यात संपकरी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याप्रकरणी मंत्री दिवाकर रावतेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
 
बुधवारी सकाळी ११ पर्यंत कामावर हजर न झाल्यास निलंबन कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र तशी कारवाई सरकार करू शकले नाही. नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना गेस्ट हाऊसमधून बाहेर काढण्याची तोंडदेखली कारवाई परिवहन विभागाने केली. ‘तुम्ही अनावश्यक खर्च केल्याने एसटी महामंडळ तोट्यात गेले, असा संघटनांचा आरोप आहे,’ याकडे मंत्री रावते यांचे लक्ष वेधले असता ते पत्रकारांवरच भडकले. तर संप चिघळण्यास रावतेच जबाबदार अाहेत, असा अाराेप इंटक संघटनेने केला अाहे. दरम्यान, कर्मचारी संघटना संप मागे घ्यावा, असे अावाहन दुसऱ्या दिवशीही रावतेंनी केले.   

प्रवासी संतप्त : या संपामुळे एसटीला सुमारे ६० कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांचे पैसे परत देण्याची कोणतीही व्यवस्था एसटी महामंडळाने केली नाही. त्यामुळे दिवाळीतही गावी न जाऊ शकलेले राज्यभरातले लाखो प्रवासी एसटी महामंडळावर तसेच संप मिटवण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकार व मंत्री रावतेंवर संतप्त झाले आहेत. 

 तर दर चार वर्षांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार होत असतो. सध्याच्या कराराची मुदत मार्च २०१६मध्ये  संपली आहे. करार करण्यात रावते यांनी चालढकल केली, करार लवकर केला असता तर संपाची वेळ आली नसती आणि लाखो प्रवाशांचे हाल टळले असते, असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
नगर जिल्ह्यात संपकरी वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू
अकाेले | संपकरी एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक सुरू असतानाच अकोले आगारातील वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना येथील एसटी आगारात बुधवारी दुपारी दीड वाजता घडली.   
एसटी कर्मचारी त्वरित कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्यानंतर अकोले येथील बसस्थानकात कृती समितीची बैठक सुरू झाली. मंत्र्यांच्या वक्तव्याचा धसका घेतल्याने वाकचौरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा अाराेप कृती समितीने केला अाहे. त्रास जाणवू लागल्यानंतर वाकचौरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. वाकचौरे हे मूळचे वडगाव पान (ता. संगमनेर) येथील रहिवासी आहेत. सध्या ते शेकईवाडी (अकोले) येथे पत्नीसह वास्तव्यास होते. 
बातम्या आणखी आहेत...