आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आंतरराष्ट्रीय वाघ तस्करांना 7 वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तीन वर्षांपूर्वी मेळघाटातील ढाकणा वनपरिक्षेत्रात स्थानिक शिकाऱ्यांना लाखो रुपये देऊन वाघाची शिकार केल्याप्रकरणी तीन आंतरराष्ट्रीय तस्करांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एस. माने यांच्या न्यायालयाने गुरूवारी (दि. १०) सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, वाघाची शिकार करणाऱ्या चार स्थानिक शिकाऱ्यांना न्यायालयाने यापूर्वीच शिक्षा ठोठावली आहे.
रणजित भाटीया (६०, रा. हरियाणा), सरजू बावरीया आणि दलबिर बावरिया असे शिक्षा झालेल्या आरोपी तस्करांचे नावे आहेत. मेळघाट जंगलातील ढाकणा वनपरिक्षेत्रात डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या दरम्यान वाघाची शिकार झाली होती. ही शिकार स्थानिक शिकारी मधुसिंग त्याच्या सहकाऱ्यांनी केली होती. ही घटना मार्च २०१३ ला उघडकीस आली होती. मात्र तोपर्यंत शिकार झालेल्या वाघाच्या कातडीसह त्याचे नखे किंवा इतर साहित्य आरोपींनी विकले होते.तपासादरम्यान वनविभागाच्या पथकाने स्थानिक शिकाऱ्यांना अटक केली त्यावेळी रणजित भाटीयाचे नाव पुढे आले. रणजित भाटीया याने मधुसिंगला लाख ६५ हजार रुपये देवून वाघाची शिकार करून घेतली होती. या रक्कमे व्यतिरिक्त शिकारीसाठी आवश्यक असलेला 'ट्रॅप' त्याने पुरविल्याचे चौकशीत पुढे आले होते. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने हरियाणा विशाखाट्टनम येथून रणजित भाटीया, सरजू आणि दलबिर या तिघांना दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. हे तिघेही आंतरराष्ट्रीय तस्कर असून त्यांना अटक केल्यानंतर वाघतस्करीबाबत मोठी माहिती उघड झाली होती. या तस्करांनी नेपाळ अन्य देशातही वाघाचे साहित्य पोहचवल्याचे तपासात पुढे आले होते. या प्रकरणाची येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षाने सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने या तिन्ही तस्करांना सात वर्ष कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाकडून मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅड. उदय देशमुख यांनी युक्तिवाद केला.
बातम्या आणखी आहेत...