अमरावती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा ‘फतवा’ शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेल्या शासनाने काढला असला तरी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सर्रास हमीभावाची ‘कत्तल’ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, एकीकडे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्याच्या नोटिसा बाजार समित्यांनी अडत्यांना बजावल्या असल्या तरी शेतमालाचे वर्गीकरण करणारी यंत्रणाच अस्तीत्वात नसल्याने अडत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, मुग, उडदाच्या उत्पादनाची स्थिती भयावह आहे. मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे उडीद, मुगाचे उत्पादन कमालीचे घसरले आहे. त्यातच अल्प पाऊस वातावरण बदलामुळे सोयाबीनकडूनही फारशी उत्पादनाच्या आशा दिसून येत नाही. अशा स्थितीत बाजारात सध्या सोयाबीन, मुग, उडीद विक्रीसाठी येण्यास सुरवात झाली आहे. परंतु सोयाबीन मध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक दर्जा निम्न स्वरुपाचा असल्यामुळे शेतमालाची खरेदी सध्या हमीभावापेक्षा कमी दराने सुरू आहे. दरम्यान शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. याबाबतच्या नोटिसा काही बाजार समित्यांमध्ये अडत्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमकी खरेदी कशी करावी असा पेच अडत्यांसमोर उभा ठाकला असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. त्यातच गुन्हे दाखल होण्याच्या भितीमुळे दर्जा खालावलेल्या शेतमालाची खरेदी करण्यास व्यापारी, अडते धजावत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष
पैशांची अडचणअसल्याने क्विं. सोयाबीन २७०० रूपये भावाने विकला. हमीभाव देता बाजार समितीत खरेदीदारांचा मनमानी कारभार सुरू असून याकडे सभापती, संचालक मंडळाचे दुर्लक्ष आहे. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी संतापजनक आहे.
- विजय चितांमणे, शेतकरीविरवाडा,ता.दर्यापूर
शेतकऱ्यांच्या संमतीने विक्री
शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्याबाबत आठ दिवसापुर्वी नोटीस दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपला माल विकायचाच आहे त्यांचे लेखी संमतीपत्र घेण्यात येत आहे.
- हिम्मत रावमातकर, प्र.सचिव, कृउबा, दर्यापूर
शेतमालात ओलावा अधिक
बाजारात विक्रीस आलेल्या शेतमालात १२ टक्के ओलावा ग्राह्य धरला जाऊ शकतो. सध्याच्या स्थितीत शेतमालात २५ टक्के पर्यंत ओलावा असल्याने शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने विकला जात आहे. शेतकरी माल विकण्यास तयार असल्याने प्रश्न उद्भवणार नाही.
- जी.पी. राऊत, सहायक निबंधक, धामणगाव रेल्वे.
हमी भावाने शासनाने माल खरेदी करावा
हमीभावाचे तीन ग्रेड असणे आवश्यक आहे. गुन्हे दाखल करणे हा न्याय नाही. एकीकडे खरेदीदारांनी ५०५० रुपयांत खरेदी केलेली तूर ४००० रुपयांत विकायची खरेदीदाराला पेचात पाडण्यापेक्षा शासनानेच हमी भावाने शेतमालाची खरेदीकरावी.
- सतीश मुदंडा, अध्यक्ष, अडते असो.धामणगाव रेल्वे.
याबाबत आपणजिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सभापतींसोबत चर्चा करणार असून, सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल.
- प्रफुल्ल राऊत, सभापती, कृउबा, अमरावती
शेतकऱ्यांचा नाईलाज
जिल्ह्यात यावर्षी अल्प पाऊस वातावरणातील बदलाने मुग, उडीद, सोयाबीन, कपाशी संत्रा पिकांची बिकट अवस्था झाली आहे. रब्बी हंगाम, दिवाळी तोंडावर आहे. पीक कर्ज मिळाल्यानेे उसनवार व्याजबट्ट्यावर शेतकऱ्यांनी पिके उभी केली. त्यातच उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जुळवणी करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतमाल विकणे निकडीचे झाले आहे.