आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या कन्येने धनुर्विद्येत उमटवला ठसा, आशियाई धनुर्विद्या चॅम्पियनशिपमध्ये पटकावले रौप्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चायनीज तायपेई येथील आशिया चषक धनुर्विद्या चॅम्पियनशीपमध्ये (तिसरे चरण) अमरावतीकर गुणी धनुर्धर पूर्वशा शेंडेने तिच्या आजी उषा शेंडे यांच्या विश्वासावर खरी उतरताना कम्पाऊंड सांघिक प्रकारात जुलै रोजी सायंकाळी झालेल्या अंतिम लढतीत रौप्यपदक पटकावले. 

आपली नात ही मुलापेक्षा कमी कर्तृत्ववान नाही. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेऊन तिलाही उत्तम गुरूकडे धनुर्विद्येचे धडे घेण्यास पाठवा असा अट्टहास आजी उषा यांनी बाळगल्यामुळे वडील सुधीर शेंडे यांनी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे पूर्वशाला प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. तेथे दोन वर्षे प्रशिक्षण घेऊन तयार झालेली उत्तम धनुर्धर पूर्वशाने गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने देशाला पदकांची कमाई करून दिली. 

अमरावती येथील केएल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या पूर्वशाने दिव्या दयाल, मेघा अग्रवाल यांच्यासह सुरेख ताळमेळासह खेळ करून चायनीज तायपेईविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत रौप्यपदक पटकावले. चायनीज तायपेईने घरच्या वातावरणाचा लाभ घेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय मुलींनी २२८ वि. २२५ गुणांची नोंद केली. 

तत्पूर्वी उपांत्य सामन्यातही पूर्वशा, दिव्या, मेघा या त्रिकुटाने मलेशियाविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत २१५ विरुद्ध २१६ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली होती. पूर्वशासोबतच तिचे गुरू आणि वडील सुधीर शेंडे यांचे भारतीय धनुर्विद्या संघटना, राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, के.एल. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. भांगडिया, शारीरिक शिक्षण विभाग संचालक सतीश मोदानी, प्रा. रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे. 

देशाला आशियाई क्रीडास्पर्धेतही पदक 
पूर्वशा शेंडेने आशियाई क्रीडा स्पर्धेत कम्पाऊंड धनुर्विद्या प्रकारात देशाला सांघिक कांस्यपदक जिंकून दिले आहे. यासह तिने जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व केले असून कम्पाऊंड धनुर्विद्या संघात सातत्याने आशियाई जागतिक चॅम्पियनशिपसाठी स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. 
बातम्या आणखी आहेत...