आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पावसाचे शहरासह जिल्ह्यात थैमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रोहिणीच्या पहिल्याच पावसाने शनिवारी (दि. २७) दुपारपासून जिल्ह्यासह शहरात वादळासह थैमान घातले. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विजेच्या तारांवर फांद्या कोसळल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. तर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमाल भिजला. दरम्यान या वादळाच्या तडाख्याने भिंत पडून एक महिला गंभीर झाली असून चौघे जखमी झाले आहेत. 
 
दरवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास महिनाभरापूर्वी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता शहरासह जिल्ह्यातील काही भागात अचानकपणे वादळी पावसाने हजेरी लावली. मात्र अर्धा तास कोसळल्यानंतर हा पाऊस बंद झाला. त्यानंतर सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास जोरदार वादळ पाऊस आला. या वादळाने शहरातील दहा ते बारा ठिकाणी मोठ -मोठे वृक्ष कोसळले. मोठ्या आकाराचे होर्डींग्स फाटले, काही ठिकाणी होर्डींग पूर्णपणे खाली येऊन कोसळले. झटक्याची हवा असल्यामुळे झाडाच्या फांद्या तूटून विद्युत तारांवर पडल्याने अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला होता. 

दरम्यान याच वादळांमुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली आहेत. शहरातील खोलापूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हैदरपुरा परिसरातील एका घरावरील टिन उडाले. त्यामुळे घराला असलेली विटांची भिंत कोसळली. यावेळी भिंतीखाली दबल्याने नूरजहा ॅपरविन अजीम खान (३०) या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला. याचवेळी नूरजहाॅ यांचा दिर मोहसीन खान कलीम खान (२२) यालाही मार लागला आहे. नूरजहाॅ यांच्या डोक्याला गंभीर मार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. इर्विनमधून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले. तसेच सातखिराडीमध्ये राहणारे सागर कमलसिंग ठाकूर आणि दर्पण दिलीपसिंग ठाकूर हे दोघे सांयकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शहरात आले होते. शहरातून घराकडे जात असताना नमुना परिसरात असताना अचानकपणे वादळी पाऊस आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी उभी केली एका ठिकाणी उभे राहीले. त्याचवेळी परिसरातील एका घरावरील एक हजार लीटरची वॉटर टँक या दोघांच्या अंगावर येवून पडली. यामध्ये सागर दर्पण या दोघांनाही दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी इर्विनमध्ये आणले होते. रेवसा येथे अंगावर झाडाची फांदी पडल्याने नारायण साळुंके नामक व्यक्ती जखमी झाले. 

सांयकाळी आलेल्या वादळाने शहरासह वलगावातही मोठे नुकसान झाले आहे. वलगावातील काही घरावरील टिन उडाले. तर एका घराची भिंत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. 
याभागात कोसळली झाडे : शहरातीलमोतीनगर, बालाजी प्लॉट, यशोदानगर, शांती नगर, मोतीनर बगिचा, शेगाव नाका, भाजीबाजार मनपा शाळा, अंबिका नगर, बियाणी चौक, मुदलीयार नगर, जलाराम नगर गल्ली क्रमांक १, गौतम नगर, सुयोग कॉलनी, अंबापेठ, शिक्षक कॉलनी यासह शहरातील अनेक भागात लहान मोठी झाड उन्मळून खाली पडली आहे. याचवेळी शहरातील आदिवासी कॉलनी, राजापेठ, रविनगर भागातील काही भागात तरळक गारपीटसुद्धा झाल्याची माहिती आहे. 

बाजारसमितीत धान्याचे पोते भिजले :दुपारी साडेतीन वाजता काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. हाच पाऊस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही कोसळला. यावेळी शेतकऱ्यांनी आणलेल्या कृषी मालांच्या पोत्यांपैकी काही पोत्यांचे मोजमाप झाले होते मात्र धान्याचे सर्व पोते बाहेरच होते. दरम्यान त्याचवेळी धो -धो पाऊस कोसळला. या पावसात बाजार समितीच्या आवारात असलेले तूर, सोयाबिन हरभऱ्याचे जवळपास चार ते पाच हजार पोते पाण्याने भिजले असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

विजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न 
^सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आलेल्या वादळाने मोठ मोठी झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील जवळपास ७० टक्के परिसरातील विजपुरवठा सुरळीत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सौरभमाळी, शहर अभियंता, महावितरण. 

वलगाव ते नवसारी दरम्यान एकाचा मृत्यू 
दरम्यान साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास वलगाव ते नवसारी मार्गावर एका झाडाखाली उभ्या असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला, हे शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत पुढे आले नव्हते. व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनाही मिळाली होती मात्र मृत्यूचे कारण त्यांनाही रात्री दहा वाजेपर्यंत मिळाले नव्हते. 
उघड्यावर असलेले तूर सोयाबीनचे पोते असे भिजले आहेत. 

 
बातम्या आणखी आहेत...