आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संपूर्ण कर्जमाफी’साठी शेतकऱ्यांना एकत्र करणार, राजु शेट्टी यांचे मेळाव्यामध्ये प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना एकत्र करणार असून येणाऱ्या २१ २२ नोव्हेंबर रोजी दहा लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले. सुकाणू समिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त सहकार्याने रविवारी (दि. १३) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. 

मेळाव्याला वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, प्रदेश प्रवक्ता गजानन अहमदाबादकर, सुषमा जाधव, जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, राहुल कडु आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सत्तेवर असणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली आहे. कर्जमाफीचे फसवे आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या वेदनेत शासनाने भर घातली असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. वर्धा प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे. मात्र हे पाणी कंपन्यांचा घशात चालले आहे. पाणी आपले मात्र रोजगार दुसऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. 

शासनाला सत्तेतून हद्दपार करण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे, असेही शेट्टी म्हणाले. कर्जमाफीच्या मुद्यावर वेळोवेळी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा मेळावा असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. देवेंद्र भुयार यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजानामागील भूमिका विषद केली. मेळाव्याचे सुत्रसंचालन गंगाधर दवंडे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट शेतकऱ्यांना शपथ देवून करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...