अमरावती - प्रभूश्री रामचंद्रांचा जन्मोत्सव अंबानगरीतील विविध मंदिरांमध्ये उत्साह आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला. चैत्र महिन्यातील नवमी अर्थात राम नवमीला अमरावती श्री राममय झाली होती. अगदी पहाटेपासूनच रामजन्मोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली. शहरातील भक्तीधाम, राजापेठ येथील राममंदिर, प्रभातनगर येथील गजानन महाराज मंदिर, सौरभ काॅलनी येथील मंदिरासह बहुतेक सर्वच मंदिरांमध्ये लहान-मोठ्या प्रमाणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुख्य चौक भगव्या पताका, ध्वज, तोरणे, श्रीरामचंद्रांच्या मोठ्या प्रतिमांनी सजवण्यात आले होते.
सकाळी मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर होम-हवन करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० ते १२ या कालावधीत कीर्तनाला सुरुवात झाली. दु. १२ वाजता बहुतेक सर्वच मंदिरांमधून ‘चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती। दोन प्रहरी कां शिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखे राम जन्मला ।। हे गीत रामायणातील स्वर कानी पडले. यासोबतच सर्व मंदिरांमध्ये गुलाल, सुंठवडा, फुले उधळून रामजन्माचे मनोभावे स्वागत करण्यात आले.
रामजन्मानंतर पाळणा करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांना काला, बुंदीचे लाडू, पेढे, सुंठ साखर असा प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर बहुतेक मोठ्या मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहरातील बहुतेक गजानन महाराज मंदिरांमध्येही रामजन्माचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही महाभिषेक, महाआरती, कीर्तन, रामजन्म, काला, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
राजापेठ चौकातील श्री राम मंदिराबाहेर तर रामफळांची दुकाने थाटण्यात आली होती. रामफळ श्रीरामांना विशेष प्रिय असल्यामुळे भाविकही ते खरेदी करून प्रभू चरणी अर्पण करीत होते. दु. १२ वाजता भर उन्हात भाविकांनी मंदिराबाहेर उभे राहून रामजन्म साजरा केला.
बुडूनगेले नगर सर्व नृत्यगायनी : विश्वहिंदू परिषद बजरंग दलातर्फे सायंकाळी सीताराम बाब मंदिर, बालाजी प्लाॅट येथून श्री रामजन्मानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य चौकातून ही शोभायात्रा जात असताना फुले उधळून भाविकांनी तिचे स्वागत केले. शोभायात्रेत चित्ररथ, नर्तक, वादक असा ताफा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. फटाक्यांची आतषबाजी, भगवे ध्वज यामुळे बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी, सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी डोलतसे तिही, जर शेष डोलला ।। या ओळींचा प्रत्यय आला. सर्वत्र उत्साह दिसत होता. सरबत, हलवा, चिरंजीचे दाणे, पिण्याचे पाणी भाविकांना मोफत वाटण्यात आले.
प्रभातकाॅलनीतही रामजन्माचे आयोजन : शहरातीलसर्वात जुन्या मोठ्या प्रभात काॅलनी येथील गजानन महाराज मंदिरात गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. दररोज सायंकाळी येथे भाविकांसाठी भजन, कीर्तन गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले. गत नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता रामजन्माेत्सवाने झाली. सकाळी महाभिषेक केल्यानंतर श्री राम, सीता लक्ष्मणाच्या मूर्तीला आकर्षक पोशाखाने सजवण्यात आले. तसेच फळे, पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. कीर्तनानंतर दु. १२ वाजता रामजन्म आणि त्यानंतर महाआरती पाळणा करण्यात आला. काला महाप्रसाद शेकडो भाविकांना वितरित करण्यात आल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली.
भक्तिधाम : देखणा सोहळा
बडनेरा रोडवरील भक्तिधाम येथे राम जन्माचा देखणा सोहळा झाला. श्री राम, सीता लक्ष्मण यांच्या येथील देखण्या संगमरवरी मूर्तींना आकर्षक दागिण्यांनी सजवले होते. सकाळी ११ ते १२ या वेळेत रामधून आयोजित केली, त्यानंतर १२ वाजता महाआरती झाली. याप्रसंगी येथे हजारावर भाविक उपस्थित होते. महाप्रसादात रताळूचा हलवा, शोपेपासून तयार केलेले सरबत दिले. आले. त्यानंतर येथे दिवसभरात हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती भक्तिधामचे पदाधिकारी किशोर ठक्कर यांनी दिली.
चैत्र नवरात्राचीही भक्तिभावे सांगता
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्राचा समारोप रामनवमीला झाला. शहरातील अंबादेवी, एकवीरा देवी मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, होम-हवन, भजन-कीर्तनासह सामाजिक उपक्रम झाले. या नऊ दिवसांत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. रामनवमीच्या दिवशी ३० ते ४० हजार भाविकांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी श्री अंबादेवी श्री एकवीरा देवीचे दर्शन घेत प्रसादाचाही लाभ घेतला.